एका युवकाने गळ्यात गावठी बॉम्‍ब बांधल्‍यानंतर त्याचा स्‍फोट घडवून आत्‍महत्‍या केल्‍याची घटना मेळघाटातील धारणी पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील कळमखार येथे उघडकीस आली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. घरगुती वादातून ही घटना घडल्‍याचे सांगण्‍यात येते.

मधू रामू गायकवाड (३५, रा. कळमखार) असे मृताचे नाव आहे. मधू मजुरी करीत होता. त्याचा पत्‍नीसोबत वाद झाल्‍याने ती गावातच माहेरी निघून गेली होती. यामुळे तो तणावात होता. या तणावातूनच त्‍याने गळ्यात गावठी बॉम्‍ब बांधून स्‍फोट घडवून आणला. या स्‍फोटाने त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला. रात्री मोठा आवाज झाल्‍याने गावातील नागरिक घाबरले. त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेतली, तेव्‍हा गावक-यांना मोठा धक्‍का बसला. गावठी बॉम्‍बच्‍या स्‍फोटाने मधू ठार झाल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले. स्फोटात त्‍याच्‍या शरीराचे तुकडे झाले आणि ते घराच्‍या आवारात विखुरलेले दिसले. या घटनेची माहिती धारणी पोलिसांना देण्‍यात आली. पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्‍या मार्गदर्शनात पोलिसांच्‍या पथकाने पंचनामा करून मधूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धारणी येथे पाठविला. सकृतदर्शनी ही आत्‍महत्‍या असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे.

मेळघाटात गावठी बॉम्‍बच्‍या सहाय्याने तलावांमध्‍ये मासेमारी केली जाते. यापूर्वीही धारणी तालुक्‍यात गावठी बॉम्‍बच्‍या स्‍फोटात अनेकांना आपले हात गमवावे लागले आहेत.

Story img Loader