भंडारा: भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० एमकेआय (Su-30MKI) हे लढाऊ विमान ५ मार्च २०२६ रोजी आसाममध्ये कोसळले. या दुर्दैवी अपघातात महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर आणि स्क्वॉड्रन लीडर अनुज यांचा मृत्यू झाला. आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात प्रशिक्षणादरम्यान भारतीय हवाई दलाचे सुखोई Su-30MKI लढाऊ विमान कोसळले. या अपघातात शहीद झालेले फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. या अपघातात स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर या दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला.
५ मार्च २०२६ रोजी आसाममधील कार्बी आंगलोंग येथे झालेल्या सुखोई-३०एमकेआय (Sukhoi-30MKI) विमान अपघातात भारतीय हवाई दलाने आपले दोन शूर अधिकारी गमावले. शहीद फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर हे मूळचे नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी भंडारा जिल्ह्यातील शाहपूर येथील डीएसए (DSA) अकादमीमध्ये आपले लष्करी पूर्व-शिक्षण पूर्ण केले होते. ते साधारण तीन वर्षांपूर्वी हवाई दलातून पास आऊट झाले होते.
गुरुवारी नियमित सरावादरम्यान भारतीय हवाई दलाचे हे आघाडीचे लढाऊ विमान अचानक रडारवरून गायब झाले.
आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील घनदाट जंगल आणि डोंगराळ प्रदेशातून उड्डाण करत असताना विमानाचा जमिनीवरील नियंत्रणाशी संपर्क तुटला. तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. तथापि, दोन्ही वैमानिकांना वाचवण्यात यश आले नाही.
नितीन गडकरींनी अर्पण केली श्रद्धांजली
भारतीय वायुदलाच्या सुखोई (Su-30) लढाऊ विमानाच्या अपघातात शहीद झालेल्या स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त करत दोन्ही वैमानिकांच्या शौर्यपूर्ण सेवेचा गौरव केला.
गडकरी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “सुखोई विमान अपघातात स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. राष्ट्रसेवेसाठी त्यांनी दाखवलेली निष्ठा आणि धाडस भारतीय वायुदलाच्या सर्वोच्च परंपरेचे प्रतीक आहे. देश त्यांच्या बलिदानाला सलाम करतो.” या दु:खद प्रसंगी त्यांनी शहीद वैमानिकांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या असून या कठीण काळात देश त्यांच्या कुटुंबीयांसोबत उभा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, प्रशिक्षण उड्डाणादरम्यान झालेल्या या अपघातात दोन्ही वैमानिकांनी कर्तव्य बजावताना प्राणार्पण केले. या घटनेमुळे देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत असून विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
