वर्धा : प्रत्येक दिवसाचे महात्म्य नेहमी सांगितल्या जात असते. त्यात लहानपणापासून २१ जून ही तारीख प्रत्येकाच्या लक्षात राहील अशी. कारण काय तर हा दिवस काही देशात सर्वात मोठा दिवस समजल्या जातो. म्हणजे दिवस मोठा आणि रात्र लहान, या अर्थाने ही व्याख्या होत असते. खरंच असं असते कां ? तर समजून घेऊ काही रहस्य.
उन्हाळी संक्रांत
आज २१ जून म्हणजेच ‘उन्हाळा संक्रांत’ (Summer Solstice). खगोलशास्त्रीयदृष्ट्या हा दिवस उत्तर गोलार्धातील देशांसाठी वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र ठरतो. या दिवशी सूर्य आकाशात सर्वाधिक उंचीवर असतो, ज्यामुळे दिवसाचा कालावधी इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त असतो. भारतात आजच्या दिवशी साधारणपणे १३ ते १४ तास सूर्यप्रकाश पाहायला मिळतो, तर रात्र अवघ्या १० ते ११ तासांची असते. यामागील वैज्ञानिक कारणे सांगितल्या जातात.
पृथ्वी स्वतःच्या अक्षावर (Axis) सरळ नसून सुमारे २३.५ अंश (Degrees) कललेली (Tilt) आहे. तसेच पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालते. या प्रवासादरम्यान २१ जून रोजी पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने सर्वाधिक झुकलेला असतो. यामुळे सूर्याची किरणे थेट ‘कर्कवृत्तावर’ (Tropic of Cancer) लंबरूप म्हणजेच अगदी सरळ पडतात.
पृथ्वीच्या या विशिष्ट स्थितीमुळे सूर्य उत्तर गोलार्धात सर्वात जास्त काळ प्रकाशमान राहतो. परिणामी, २१ जून रोजी वर्षातील सर्वात मोठा दिवस अनुभवायला मिळतो. याउलट, दक्षिण गोलार्धात याच्या अगदी विरुद्ध स्थिती असते. तिथे २१ जून हा वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते, कारण तो भाग सूर्यापासून दूर गेलेला असतो.
२१ जूननंतर काय बदल
२१ जून हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून तो एका मोठ्या खगोलीय बदलाची सुरुवात असतो. या दिवसाला ‘उत्तरायण’ संपून ‘दक्षिणायन’ सुरू होण्याचा काळ मानले जाते. या दिवसानंतर सूर्य हळूहळू दक्षिणेकडे सरकू लागतो. परिणामी, २२ जूनपासून दिवसाचा कालावधी हळूहळू कमी होऊ लागतो आणि रात्री मोठ्या होऊ लागतात. हा बदल २२ डिसेंबरपर्यंत सुरू राहतो, जो वर्षातील सर्वात लहान दिवस ठरतो.जागतिक पातळीवर विशेष महत्त्व आहे.
या खगोलीय घटनेमुळे २१ जून या दिवसाला जगभरात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवी आरोग्य आणि निसर्गाचे संतुलन अधोरेखित करण्यासाठी याच दिवशी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ (International Yoga Day) आणि ‘जागतिक संगीत दिन’ (World Music Day) देखील साजरा केला जातो. निसर्गाची ही अनोखी किमया पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी जगभरातील खगोलप्रेमींमध्ये नेहमीच मोठी उत्सुकता असते.
