विदर्भातील उन्हाळी पर्यटनाला यंदा अवकळा

वाढत्या करोना रुग्णांमुळे यंदा पूर्वनोंदणीच नाही

(संग्रहित छायाचित्र)

अविष्कार देशमुख

वाढत्या करोनाच्या रुग्णांचा थेट परिणाम विदर्भातील उन्हाळी पर्यटनावर होत आहे. या क्षेत्रातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. विदर्भाची पहिली ओळख संत्रानगरी असली तरी दुसरी ओळख वाघांची राजधानी अशी आहे. त्यामुळे देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक विदर्भातयेत असतात. यंदा मात्र करोनामुळे त्यांची संख्या रोडावली आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठे जंगल क्षेत्र विदर्भात आहे. वाघांची राजधानी बघायला मुंबई, पुण्यासह इतर राज्यांतूनच नव्हे तर विदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. त्यामुळे येथील पर्यटनासोबतच त्याच्याशी निगडित खासगी वाहने, हॉटेल, गाईड, शहरातील हॉटेल्स उन्हाळ्यात गजबजलेली असतात. उन्हाळ्यात वाघ पाण्याच्या शोधात बाहेर येतो आणि तेथे हमखास वाघाचे दर्शन घडते. मात्र यंदा करोनाचे वाढते रुग्ण बघता पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. खासगी पर्यटन कंपन्यांना यंदा पूर्वनोंदण्या मिळालेल्या नाहीत. अनेक खासगी पर्यटन कंपन्यांना टाळे लागले असून त्यामुळे हजारो लोकांचा रोजगारही हिरावला गेला आहे.

प्रतिसाद शून्य… गतवर्षी कडक टाळेबंदी असल्याने पर्यटन क्षेत्राला मोठे नुकसान सहन करावे लागले. आता परत टाळेबंदी लागली आहे. केवळ जंगल सफारीच नव्हे तर रामटेक गडमंदिर, रेणुका माता मंदिर, कोराडी माता मंदिरसह अमरावतीच्या अंबा देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक विदर्भात येत असतात. मात्र त्याला थंड प्रतिसाद आहे.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत पर्यटकांची संख्या रोडावली आहे. विदेशातील पर्यटनस्थळे बंद असल्याने  नोंदणीही बंद आहे. याचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसणार आहे.

– प्राजक्ता बुम्हपुरी, वीणा वर्ल्ड, नागपूर.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Summer tourism in vidarbha is different this year abn