वर्धा : आजकाल योगावर लोकं लक्ष केंद्रित करू लागले आहेत. योग शिक्षकांना मागणी होत आहे. योग शिबीरे भरू लागली आहेत. योग आसने शिकल्यानंतर मग स्वतः लोकं आसन अभ्यास करतात. पण काळानुसार त्यात बदल करावा का? या तप्त उन्हात योग व्यायाम कितपत व कसा करावा? याची माहिती आवश्यक ठरते. सध्या संपूर्ण विदर्भासह राज्यात उन्हाचा पारा कमालीचा वाढला आहे. सूर्य आग ओकत असल्याने सर्वसामान्यांच्या जीवनशैलीवर याचा मोठा परिणाम झाला आहे.

वाढता उष्मा

कडक उन्हाळ्यात शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम किंवा योगासने करावीत की नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. वाढत्या तापमानामुळे योगाभ्यास करताना आरोग्याला फायदा होण्याऐवजी तोटा तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जाते. यावर आरोग्य आणि योग तज्ज्ञांनी सकारात्मक पण सावधगिरीचा सल्ला दिला आहे. उन्हाळ्यात योगासने नक्कीच करावीत, मात्र त्यासाठी काही विशेष नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

उन्हाळ्यात योगासने

तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात योगासने पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. योग्य पद्धतीने केलेला योगाभ्यास उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यास मदत करतो.विशिष्ट प्राणायामांमुळे शरीराला आतून थंड ठेवण्यास मदत होते. उन्हाळ्यातील उष्णतेमुळे येणारा आळस आणि मानसिक थकवा योगसाधनेने दूर होतो. या ऋतूत मंदावलेली पचनशक्ती योगासनांमुळे पूर्ववत होते.

योगासन प्राधान्य

उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढवणारी तीव्र आसने टाळावीत. त्याऐवजी शरीराला शीतलता देणाऱ्या आसनांची निवड करावी.
शशांकासन, बद्धकोनासन, मार्जरासन आणि ताडासन यांसारखी संथ आसने करावीत. तसेच, शरीराला पूर्ण विश्रांती देणारे ‘शवासन’ उन्हाळ्यात अत्यंत फायदेशीर ठरते. या ऋतूत ‘शीतली’आणि ‘शित्कारी’ प्राणायाम आवर्जून करावेत. जिभेतून श्वास ओढून केल्या जाणाऱ्या या प्राणायामांमुळे शरीराचे तापमान तात्काळ खाली येण्यास मदत होते. यासोबतच ‘चंद्रभेदी’ प्राणायामही शरीराला थंडावा देतो

वेळेची निवड

उन्हाळ्यात सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर जेव्हा हवेत गारवा असतो, त्याच वेळी योगासने करावीत. कडक उन्हात किंवा बंद, दमट खोलीत योगा करणे टाळावे. योगाभ्यास करताना सैल आणि सुती (कॉटन) कपडे वापरावेत, जेणेकरून घाम सहज सुकेल.योगा सुरू करण्यापूर्वी आणि नंतर शरीरात पाण्याची पातळी योग्य असावी. मात्र, योगा करताना मध्येच जास्त पाणी पिणे टाळावे. या ऋतूत जास्त घाम येत असल्याने शरीर लवकर थकते. त्यामुळे ‘सूर्यनमस्कार’ किंवा अत्यंत वेगवान आसने मर्यादित प्रमाणातच करावीत. शरीराला थकवा जाणवल्यावर त्वरित विश्रांती घ्यावी.

योगशिक्षक म्हणतात…

योगशिक्षक दामोदरजी राऊत हे नियमित शिबीरे घेत असतात. ते म्हणतात की उन्हाळ्यात योगासने करणे शरीरासाठी अमृत ठरू शकते, जर ते योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने केले गेले. निसर्गाच्या बदलत्या चक्रानुसार आपल्या योगसाधनेत बदल करणे हेच उत्तम आरोग्याचे सूत्र आहे. अनुलोम विलोम उत्तम. जॉगिंग टाळावे. खूप घाम जावू, ही काळजी घ्यावी. कारण शरीरातून घामावाटे पाणी जात असतेच. पहाटे ते सकाळी आसने केल्यास बरे.