अकोला : पृथ्वी सूर्याच्या कक्षेत फिरत असल्याने अंतर कमी-अधिक होत असते. आज, ६ जुलैला सूर्य पृथ्वीपासून सर्वात दूर राहणार आहे. या स्थितीला अपसूर्य असे म्हणतात. यावेळी अंतर १५.२० कोटी कि.मी. राहील, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली.

उपसूर्य आणि अपसूर्य म्हणजे काय?

पृथ्वी सूर्याभोवतीची कक्षा काहीशी लंबवर्तुळाकार असल्याने या दोन्ही मधील अंतर कमी अधिक होत असते. उपसूर्य ही पृथ्वीच्या कक्षेत अशी स्थिती असते, जेव्हा पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असते. या काळात सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर कमी असते. ही घटना दरवर्षी ३ ते ४ जानेवारी दरम्यान घडते, ज्याच्या परिणामी सूर्य आकाराने थोडा मोठा आणि अधिक तेजस्वी दिसतो. यानंतर अंतर वाढत जाऊन ४ जुलैच्या सुमारास सर्वाधिक होणाऱ्या स्थितीला अपसूर्य असे समजतात. या वर्षी ही स्थिती ६ जुलै रोजी येत आहे. त्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्य पृथ्वीपासून सुमारे १५ कोटी २० लाख ८७ हजार ७०६ कि.मी. राहणार आहे, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

टक लावून पाहणे टाळावे

सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सूर्य बघतांना जरा लहान आकाराचा दिसतो. सूर्य जसा वर येईल, तसे प्रखर तेजाच्या स्थितीत सूर्याकडे पाहू नये. हे दिवस पावसाचे असल्याने विरळ ढगाआड असणारा सूर्य काही क्षण अनुभवता येईल, मात्र टक लावून पाहणे टाळावे. तसे करणे धोक्याचे ठरू शकते, असे दोड म्हणाले.

अपसूर्य स्थितीत १५ कोटी २० लाखांपेक्षा अधिक अंतर

उपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्य अंतर सुमारे १४ कोटी ७० लाख कि.मी. अंतरावर असते. अपसूर्य स्थितीत हेच अंतर १५ कोटी २० लाखांपेक्षा अधिक असते. आपल्या भागातील सूर्योदय सकाळी ५.४७ वाजता होणार असून सूर्यास्त संध्याकाळी ७.०७ वाजता होईल. दिनमान १३ तास २० मिनिटांचा राहील. यावेळी पृथ्वी सूर्य अंतर अधिक असल्याने सूर्य प्रकाश सर्वात कमी अंतरापेक्षा सुमारे १७ सेकंद अधिक वेळ घेईल. ही घटना अनोखी ठरणार आहे. आवश्यक ती काळजी घेऊन वर्षातील एकदा येणारी ही खगोलीय अनुभूती अनुभवण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राद्वारे करण्यात आले आहे.