नागपूर : उपमुख्यमंत्रिपदावर असताना बारामती येथे झालेल्या विमान अपघातात ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या विधानसभा मतदारसंघांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, सर्व पक्षांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर भाजपने बिनविरोध निवडणुकीला पाठिंबा दिला होता, अशी आठवण मुख्यमंत्री फडणवीस यांनी करून दिली.

मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. ते म्हणाले, सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. बिनविरोध निवडणूक झाली तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेशी ही बाब ठरेल. यापूर्वीही अनेकदा बिनविरोध निवडणूक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपनेही पुढाकार घेतला होता. त्यामुळे बारामती येथे पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यापूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लावला होता. काल शुक्रवारी महायुती सरकारमधील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कॉंग्रेस नेत्यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी मोठे मन करावे, असे आवाहन केले. काँग्रेस पक्षाने बारामतीसोबतच राहुरी या विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येथून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहे.

याबाबत काल बावनकुळे यांनी काँग्रेसला अजित पवार यांच्यासोबत भूतकाळातील चांगल्या संबंधाची आठवणही करून दिली होती. कॉंग्रेसने अजित पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले. कॉंग्रेसच्या नेत्यांनी ही बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली होती. आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपाची भूमिका जाहीर केली. कॉंग्रेससह रासप व वंचितच्या नेत्यांनाही त्यांनी बिनविरोध निवडणुकीचे आवाहन केले. यापूर्वी सुप्रिया सुळे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. राहुरीमध्ये मात्र काँग्रेसने उमेदवार द्यावा, तो त्यांचा अधिकार आहे, असे बावनकुळे यांनी काल शुक्रवारी नागपुरात सांगितले होते.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्या राज्यसभेच्या खासदारपदी विराजमान होत्या. मात्र उपमुख्यमंत्रिपद भूषवताना राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्यत्व घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्या अजित दादांच्या बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून येत्या ६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर व तालुक्यात बैठकांना सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गावागावात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी रणनीती आखली जात आहे.

विहिरीत कार पडल्याप्रकरणी मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीत भरधाव कार थेट विहिरीत कोसळली. यात ९ जणांचा बळी गेला. ही घटना दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. याप्रकरणी मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात येईल. याशिवाय रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीच्या अंकेक्षणाचे निर्देश देण्यात आले आहे, असे फडणवीस म्हणाले.