अकोला : अजितदादांची उणीव भरून निघू शकणार नाहीच. या परिस्थितीत पक्ष अधिक महत्त्वाचा असतो. पक्ष, कार्यकर्त्यांना सावरणे आवश्यक असते. सुनेत्रा वहिनींनी शिवधनुष्य उचलले आहे, असे मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावरही त्यांनी भाष्य केले.
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ सुनेत्रा पवार यांनी घेतल्यानंतर राज्यात चर्चेला पेव फुटले आहे. शपथविधीच्या वेळी सभागृहात ‘अजित पवार, अमर रहे,’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी राजकीय वातावरण भावूक झाले होते. या सोहळ्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. सद्यपरिस्थिवर त्यांनी भूमिका मांडली.
अमोल मिटकरी म्हणाले, “अजितदादा यांची उणीव कोणत्याही परिस्थितीत भरून निघू शकत नाही. सुनेत्रा पवार यांनी अत्यंत जड अंतःकरणाने उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. सुनेत्रा वहिनींनी हे शिवधनुष्य उचलले आहे. त्यांच्या निर्णयाचे स्वागतच आहे.”
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला आहे. हा निर्णय पार्लमेंटरी बोर्डामध्ये झाला. आम्हाला तो निर्णय पाळावाच लागेल. लोक टीका-टिप्पणी करतात, पण अशा वेळी पक्ष अधिक महत्त्वाचा असतो. दुःखाच्या या वातावरणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी सावरणे महत्त्वाचे असते, असे अमोल मिटकरी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाच्या चर्चावर बोलताना मिटकरी यांनी व्यक्तिगत भूमिका मांडली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, ही माझी शंभर टक्के इच्छा आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील. मी इतका मोठा नाही की या विषयावर अंतिम मत देऊ शकेल, असेही अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले.
‘पक्ष एकत्र असला की दुसरे लोक घुसखोरी करणार नाहीत’
दोन्ही पक्ष एकत्र असले पाहिजे. पक्ष एकत्र असला की दुसरे लोक घुसखोरी करणार नाहीत. पक्षातील एकजूट टिकवणे हेच सध्याच्या परिस्थितीत सर्वांत महत्त्वाचे आहे. दोन्ही गट एकत्र आल्यास पक्ष अधिक मजबूत राहील, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले.
अजितदादा नसल्याने काही बोलण्याची इच्छाही होत नाही
आज आमचे नेते अजितदादा नाहीत, त्यामुळे काही बोलण्याची इच्छाही होत नाही. कार्यकर्त्यांच्या भावना अद्यापही ताज्या आहेत. अशा वेळी राजकारणापेक्षा भावना आणि पक्ष संघटना सावरणे गरजेचे असल्याचे दिसून येते, असेही अमोल मिटकरी यांनी नमूद केले.

