नागपूर : राज्यसभा खासदार ते उपमुख्यमंत्री असा सुनेत्रा पवार यांचा प्रवास अलीकडच्या दोन ते तीन वर्षातील असला तरी पर्यावरण आणि जंगल, वन्यप्राण्यांसाठी त्या खूप आधीपासून काम करत आहेत. खुद्द दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा किस्सा नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सांगितला होता. तीन वर्षांपूर्वी नागपुरात आल्यानंतर त्यांनी भारतातील पहिल्या “ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर” ला भेट दिली आणि या सेंटरचे कार्य पाहून त्या हरखून गेल्या.

भारतातील पहिले “ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर” नागपुरात तयार झाले. वन्यप्राण्यावरील उपचार आणि त्याला नैसर्गिक अधिवास मिळवून देण्यासाठी असलेले वनखात्याचे अधिकृत सेंटर आहे. अल्पावधीतच या सेंटरचे नाव राज्य, देश आणि देशाबाहेर पोहचले. याच पध्दतीने त्याठिकाणी सेंटर तयार झाले आणि होत आहेत. २० नोव्हेंबर २०२२ ला नागपुरात आल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आवर्जून सेमिनरी हिल्स वरील “ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर” ला भेट दिली. येथे पाय ठेवता क्षणीच त्या अवाक झाल्या आणि संपूर्ण सेंटर पाहताना त्या हरखून गेल्या.

 त्यांना हे सेंटर इतके आवडले ही प्रत्येक बारीकसारीक गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या. “आजतागायत एवढे देश फिरली, पण अशा पद्धतीचे काम आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले”, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. इथल्या टीमचे त्यांनी विशेष कौतुक केले. वन्यजीवांसाठी इतकं समर्पित कोण कसे राहू शकते? असा प्रश्न त्यांना पडला. ट्रान्झिटच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांपासून तर इथला कर्मचारी ज्या पद्धतीने सेंटरमधील वन्यप्राण्यांची काळजी घेत आहे, ते बघून त्यांनी या सर्व टीमचे कौतुक केले.

यावेळी प्रादेशिक वनविभागाचे तत्कालीन उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा आणि “ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर” ची संकल्पना ज्यांनी भारतात पहिल्यांदा आणली ते राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना याविषयी माहिती दिली. आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्या पुन्हा या सेंटरच्या पुढील विकासासाठी काम करतील अशी अपेक्षा आहे. सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास आता सुरू झाला असला तरी पर्यावरण क्षेत्रात त्या आधीपासूनच काम करत आहेत. पर्यावरण क्षेत्रात काम करण्यासाठी “इन्व्हायर्नमेंटल फॉर्म ऑफ इंडिया” नावाची संस्था स्थापन केली आहे.  या संस्थेमार्फत त्या प्रामुख्याने जलसंधारण, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणाशी संबंधित विविध उपक्रम राबवले जातात. त्या या फोरमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.