नागपूर: ‘राष्ट्रपित्याचा अपमान म्हणजे राष्ट्राचा अपमान आहे. महात्मा गांधी यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्ये होत असताना संबंधित शासकीय यंत्रणा आणि प्रसारमाध्यमे गप्प का राहतात, हा गंभीर आणि मूलभूत प्रश्न आहे,’ असे प्रतिपादन माजी मंत्री सुनील केदार यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी करण्यात आलेल्या अवमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे शुक्रवारी व्हेरायटी चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केदार बोलत होते.
या आंदोलनात खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस, प्रदेश महासचिव कुंदा राऊत, रवींद्र दरेकर, अवंतिका लेकुरवाळे, उमेश कोराम तसेच काँग्रेसचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वि. दा. सावरकर आणि पंतप्रधानांविषयी वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, यापूर्वी संविधान निर्मात्याविषयी चुकीचे वक्तव्य झाले होते आणि आता राष्ट्रपित्याचा अवमान केला जात आहे. तरीदेखील अशा अपमानास्पद वक्तव्यांविरोधात संपूर्ण यंत्रणा गप्प असल्याची खंत केदार यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्यासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले, त्यांच्याविषयी चुकीची विधाने करणे ही देशासाठी घातक प्रवृत्ती असल्याचे ते म्हणाले. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी चिटणवीस सेंटर येथे ‘हिंदू कल और आज’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी ‘महात्मा गांधी या देशाचे राष्ट्रपिता होऊ शकत नाहीत,’ असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य खोटे, बिनबुडाचे आणि अपमानास्पद असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून संबंधित वक्ते व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
