नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला असून खासदार प्रफुल पटेल यांचे समर्थक तथा भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास पक्षांतरास तयार असल्याचे जाहीर वक्तव्य केले आहे.

राष्ट्रवादीत अस्वस्थता वाढली

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच सुनील फुंडे यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही जागा फुंडे यांच्यासाठी मागितली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय आणि सहकार क्षेत्रातील प्रभावी नेते म्हणून फुंडे यांची ओळख आहे.

भाजपचा स्थानिक ओबीसी चेहऱ्यावर भर

दरम्यान, भाजपकडून या जागेवर दावा कायम ठेवण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील स्थानिक ओबीसी नेत्याला उमेदवारी देण्याबाबत भाजपमध्ये सकारात्मक हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी ही जागा मित्रपक्षासाठी सोडण्यास अनुकूलता नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

“भाजपने संधी दिल्यास प्रवेश करेन”

सुनील फुंडे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिल्यास मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून कमळ हाती घेण्यास तयार आहे. ओबीसी चेहरा म्हणून भाजपमध्ये काम करण्याची माझी तयारी आहे,असे ते म्हणाले. तसेच प्रफुल पटेल आमचे नेते आहेत. भाजप नेतृत्वाने सकारात्मक भूमिका घेतल्यास प्रफुलभाईंसोबत चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न करेन, असेही त्यांनी नमूद केले.

महायुतीतील समीकरणांकडे लक्ष

फुंडे यांच्या विधानामुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आणि भाजपचा वाढता प्रभाव यामुळे आगामी विधान परिषद निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः ओबीसी नेतृत्वाच्या मुद्द्यावर भाजपने भूमिका ठाम ठेवल्यास राष्ट्रवादीसमोर अडचणी वाढू शकतात.