गडचिरोली : बस्तरच्या दंडकारण्यात गेली अनेक दशके दहशतीचे दुसरे नाव बनलेला आणि १ कोटींहून अधिक बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी कमांडर सुन्नम पापाराव याच्या मुसक्या आवळण्यासाठी आता प्रशासनाने ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे. मधल्या काळात पापाराव चकमकीत मारला गेल्याच्या चर्चा होत्या. मात्र, तो आजही सशस्त्र नक्षलवाद्यांच्या तुकडीसह जंगलात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता पापारावच्या आत्मसर्पणासाठी भावनिक आवाहन आणि लष्करी दबाव असे दुहेरी चक्रव्यूह रचले आहे.

प्रशासनाकडून कुटुंबियांना साकडे

नुकतेच तेलंगणामध्ये छत्तीसगडमधील तब्बल १२५ नक्षलवाद्यांनी एकाच वेळी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. या ऐतिहासिक घटनेमुळे नक्षली चळवळीला मोठा हादरा बसला असून, याच धर्तीवर आता पापारावनेही शस्त्रे खाली टाकावीत, यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासनाने थेट त्याच्या घराचा उंबरठा ओलांडला. सुकमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी स्वतः पापारावच्या गावी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पापारावला सांगा, आता हिंसाचाराचा मार्ग संपला आहे. १२५ सहकाऱ्यांनी घेतलेला मार्ग स्वीकारा आणि शरणागती पत्करा, असे आवाहन प्रशासनाने त्याच्या नातेवाइकांमार्फत केले आहे.

दंडकारण्याची खडा न खडा माहिती

सुन्नम पापाराव उर्फ ‘मंगू दादा’ हा दंडकारण्य स्पेशल जोनल कमिटीचा अत्यंत प्रभावशाली सदस्य असून पश्चिम बस्तर विभागाचा इंचार्ज आहे. एके ४७ सह वावरणारा पापारावला स्थानिक भौगोलिक रचनेची उत्तम माहिती व अभ्यास असल्याने तो अनेकदा सुरक्षा दलांच्या तावडीतून निसटला आहे. काही काळापूर्वी झालेल्या चकमकीत त्याची पत्नी उर्मिला मारली गेली, मात्र पापाराव तिथून पळ काढण्यात यशस्वी झाला होता. शंभरहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला हा नक्षल नेता सध्या सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे. विशेष म्हणजे देशभरात नक्षल संघटनेचे पॉलीट ब्युरो सदस्य मुप्पला लक्ष्मणराव उर्फ गणपती आणि मिशीर बेसरा असे केवळ दोन सर्वोच्च नेते शिल्लक आहेत.

आत्मसमर्पणाची शेवटची संधी

गृहमंत्री अमित शहा यांचा सूचनेनुसार सुरक्षा दलाची ३१ मार्चपूर्वी देशातून नक्षलवाद हद्दपार करण्यासाठी दोन वर्षापासून आक्रमक मोहीम सुरू आहे. त्यामुळे २०२६ च्या सुरुवातीलाच डीआरजी आणि विशेष पथकांनी पापारावला ‘जिवंत किंवा मृत’ पकडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तेलंगणातील मोठ्या प्रमाणावरील आत्मसमर्पणानंतर नक्षली फळी खिळखिळी झाली असून, पापारावने शरणागती पत्करल्यास बस्तरमधील नक्षलवादाचा अध्याय कायमचा मिटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाने आता चेंडू पापारावच्या कोर्टात टाकला असून, तो कुटुंबीयांच्या आवाहनाला प्रतिसाद देतो की जंगलातच आपला अंत ओढवून घेतो, याकडे आता सुरक्षा यंत्रणांचे लक्ष लागले आहे.