गडचिरोली : एकेकाळी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे ‘लाल’ दहशतीच्या विळख्यात अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्याला नक्षलवादाच्या छायेतून बाहेर काढून तिथे विकासाची नवी पहाट आणणारे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची कोल्हापूरला बदली झाली आहे.
‘काटेरी मुकुट’ समजल्या जाणाऱ्या गडचिरोलीच्या या पदावर साडेतीन वर्षांचा प्रदीर्घ आणि ऐतिहासिक कार्यकाळ पूर्ण करून नीलोत्पल जेव्हा जिल्ह्याचा निरोप घेत आहेत, तेव्हा त्यांच्या नावावर एका नव्या युगाची नोंद झाली आहे. गडचिरोली आता नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून नाही, तर ‘स्टील हब’ म्हणून ओळखला जात आहे, आणि या बदलाचे खरे शिल्पकार म्हणून पोलीस दलाकडे पाहिले जाते.
निलोत्पल यांच्या कार्यकाळाने गडचिरोलीच्या इतिहासातील अनेक समीकरणे बदलून टाकली. सर्वात मोठे यश म्हणजे नक्षलवादी चळवळीचे कंबरडे मोडण्यात त्यांना आलेले यश. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सी-६० कमांडोजनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दुर्गम भागात मोहिमा राबवत ५० जहाल नक्षल्यांना कंठस्नान घातले. मात्र, केवळ बंदुकीने विजय मिळवता येत नाही, हे ओळखून त्यांनी नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणासाठी प्रवृत्त केले. याचाच परिणाम म्हणून ऑक्टोबर २०२५ मध्ये नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता ‘भूपती’ याने आपल्या ६१ सहकाऱ्यांसह पोलिसांसमोर शरणागती पत्करली. ही घटना नक्षलवादाच्या इतिहासातील सर्वात मोठा धक्का ठरली. त्यांच्या काळात एकूण १६७ नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात येणे पसंत केले असून आज संपूर्ण जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतपत म्हणजे केवळ ६ नक्षलवादी उरले आहेत. मात्र, ते जिल्ह्यात सक्रिय नसून छत्तीसगडच्या जंगलात दडून आहेत.
निलोत्पल यांच्या रणनीतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘शून्य भरती’, गेल्या चार वर्षांत जिल्ह्यातील एकही स्थानिक तरुण नक्षलवादी चळवळीत सामील झाला नाही, हे त्यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठे यश आहे. तरुणांच्या हाताला बंदुकीऐवजी काम आणि सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘प्रोजेक्ट उडान’ सारखे उपक्रम राबवले. ‘एक गाव एक वाचनालय’ उपक्रमामुळे अनेक दुर्गम गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार मिळाला. सुरक्षा व्यवस्थेतील सर्वात मोठी पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी बिनागुंडा, कवंडे आणि वांगेतुरी यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि दुर्गम भागात ११ नवीन पोलीस मदत केंद्रे उभारली. या चौक्यांमुळे नक्षलवाद्यांची रसद तुटली आणि सरकारी योजना थेट सामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. यादरम्यान दोन दुःखद घटना वगळता पोलीस दलास कोणतीही हानी झाली नाही.
पोलीस दलाचा केवळ ‘खाकी’ चेहरा न ठेवता त्यांनी तो लोककल्याणकारी बनवला. ‘दादालोरा खिडकी’ या उपक्रमाच्या माध्यमातून तब्बल १० लाखांहून अधिक नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून दिले. ‘संजीवनी’ सारखे उपक्रम राबवून आदिवासींच्या मनात पोलिसांविषयी विश्वासाचे नाते निर्माण केले. आज गडचिरोलीत लोहखनिज प्रकल्पांच्या माध्यमातून हजारो कोटींची गुंतवणूक होत आहे आणि जिल्हा औद्योगिक प्रगतीकडे झेपावत आहे, याचे श्रेय निलोत्पल यांच्या नतृत्वात पोलीस दलाने निर्माण केलेल्या सुरक्षित वातावरणाला जाते.
नक्षलग्रस्त गडचिरोलीचे शेवटचे ‘एसपी’ म्हणूनही नीलोत्पल यांचे नाव जिल्ह्याच्या इतिहासात कायमचे कोरले जाईल. नक्षलवादाचा सूर्यास्त करून विकासाचा सूर्योदय घडवून आणणारा हा अधिकारी आता कोल्हापूरच्या बंदोबस्ताची धुरा सांभाळणार आहे. नक्षलमुक्त गडचिरोलीच्या प्रवासात अनेक अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळेच आज गडचिरोलीची ओळख बदलत आहे. त्यात निलोत्पल यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे.
