महेश बोकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यातील अकोला, यवतमाळ, औरंगाबाद, लातूर येथे कोटय़वधींच्या निधीतून चार सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी वास्तू उभारल्या. परंतु औरंगाबादचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील काही विभाग वगळता इतर रुग्णालयांत आंतरुग्ण विभाग सुरू करण्याचा केवळ देखावा केला.

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असताना २०१४ मध्ये राज्य शासनाने केंद्राच्या मदतीने राज्यात चार सुपरस्पेशालिटी रुग्णालये उभारण्याची घोषणा केली होती. यात विदर्भ आणि मराठवाडय़ाला प्रत्येकी दोन रुग्णालये मिळाली होती. विदर्भातील अकोला आणि यवतमाळ व मराठवाडय़ात औरंगाबाद आणि लातूर येथे ही रुग्णालये उभारण्यास मान्यता देण्यात आली होती. २०१६ मध्ये चारही ठिकाणी कामांना प्रारंभ झाला.  तीनच वर्षांत ही चारही रुग्णालये बांधूनही झाली.

अकोल्याचे रुग्णालयही २०१९ मध्ये बांधून तयार झाले. मध्यंतरी ही कोटय़वधींची वास्तू धूळखात असल्याचा आरोप झाला. त्यानंतर येथे काही बाह्यरुग्ण विभाग सुरू करून वेळ काढला जात आहे. यवतमाळच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचीही स्थिती फारशी चांगली नाही. येथेही काही बाह्यरुग्ण विभाग सुरू केले गेले. परंतु अकोला, यवतमाळला आजाराचे निदान झाल्यावर रुग्णांना  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीतच पाठवले जाते. लातूरलाही ही वास्तू धूळखात  असून येथे बाह्यरुग्ण विभागात नूतनीकरणाचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते.  औरंगाबादला मात्र काही विभाग सुरू झाले असले तरी पूर्ण क्षमतेने ते सुरू झाले नाही.  या चारही वैद्यकीय महाविद्यालयात तज्ज्ञ डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. परंतु ही पदे  भरणार कधी, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

वैद्यकीय शिक्षक ऐवजी तज्ज्ञ डॉक्टर हवे

वैद्यकीय शिक्षण खात्याकडून चारही सुपरस्पेशालिटी रुग्णालयात भविष्यात पदव्युत्तर जागा सुरू करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षक म्हणून तज्ज्ञ डॉक्टर घेण्याची तयारी आहे. परंतु, प्रत्यक्षात येथे ही पदे मिळण्यात अडचणी आहेत. त्यामुळे येथे विविध विषयातील तज्ज्ञ डॉक्टर घेतल्यास  रुग्णालय सुरू होऊन गरिबांना मोफत वा माफक दरात उपचार मिळतील.

अधिकारी काय म्हणतात?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोलाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये (वाहने) यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी नंतर बोलतो असे सांगून टाळाटाळ केली. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील  म्हणाले, तेथे बाह्यरुग्ण विभाग सुरू झाले, आंतरुग्ण सेवा सुरू करण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार तातडीने पद भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Superspeciality hospitals specialist doctors buildings just ornamental structures ysh
First published on: 11-11-2022 at 00:02 IST