नागपूर : कारवाई टाळण्यासाठी पदाचा राजीनामा देणाऱ्या न्यायाधीशांसह घटनात्मक पदाधिकाऱ्यांना निवृत्तीनंतरचे लाभ, सुविधा आणि अन्य हक्क देण्याच्या प्रथेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जोयमल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने या याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. या याचिकेला माजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या अधिकृत निवासस्थानी जळालेल्या चलनी नोटा सापडल्याच्या वादानंतर त्यांच्याविरुद्ध हटवणीच्या प्रक्रियेची पावले उचलण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी एप्रिल २०२६ मध्ये राजीनामा दिला. यामुळे राजीनामा दिल्यानंतर हटवणीची संसदीय प्रक्रिया पुढे चालू राहू शकते का आणि अशा व्यक्तीच्या निवृत्तीनंतरच्या हक्कांचे काय, हा घटनात्मक वादही पुढे आला आहे.

कारवाई सुरू झाली की राजीनामा; मात्र लाभ कायम?

याचिकाकर्ते प्रतिक वीरा यांनी संविधानाच्या अनुच्छेद ३२ अंतर्गत दाखल केलेल्या याचिकेत महत्त्वाचा घटनात्मक प्रश्न उपस्थित केला आहे. एखाद्या घटनात्मक पदाधिकाऱ्याने पदावरून हटवले जाण्याची कारवाई टाळण्यासाठी राजीनामा दिल्यास, त्याला संबंधित घटनात्मक पदाशी निगडित कोणतेही लाभ, सुविधा, सवलती अथवा हक्क मिळू नयेत, अशी घोषणा करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. हटवणीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा ती सुरू होण्याची शक्यता टाळण्यासाठी कार्यकाळाच्या मध्यात राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना तरीही लाभ मिळत राहण्याची तरतूद असल्यास ती संविधानाच्या अनुच्छेद १४ मधील समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात असल्याचे घोषित करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. याचिकेचा निकाल लागेपर्यंत केंद्र सरकारने अशा पदाधिकाऱ्यांना सुविधा देऊ नयेत, असा अंतरिम आदेश देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

‘उच्च घटनात्मक पद म्हणजे केवळ अधिकार नव्हे, तर त्तरदायित्वही’

याचिकेनुसार, उच्च घटनात्मक पद स्वीकारणाऱ्या व्यक्तीवर संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करण्याचे अथवा आवश्यक असल्यास पारदर्शक हटवणी प्रक्रियेला सामोरे जाण्याचे एक अलिखित घटनात्मक दायित्व असते. हटवणीची कारवाई टाळण्यासाठी राजीनामा देणे हा सोपा पर्याय उपलब्ध असू नये, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला आहे. अशा प्रकारे राजीनामा देऊन हटवणीची प्रक्रिया निष्प्रभ करण्याची पद्धत संविधानाने घटनात्मक पदाधिकाऱ्यांवर ठेवलेल्या विश्वासाला धक्का देणारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. सार्वजनिक जीवनातील ‘प्रोबिटी’ अर्थात सचोटी आणि उच्च नैतिक निकषांचे पालन करणाऱ्या व्यक्तींनी, आवश्यक असल्यास, हटवणीच्या प्रक्रियेलाही सामोरे गेले पाहिजे, असेही याचिकेत म्हटले आहे.