नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची मुलगी रेवती सुळे यांच्या लग्नाची घोषणा केली आहे.
नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्याबरोबर रेवती विवाहबंधनात अडकणार आहेत. अरुण लखानी हे नागपूर मधील प्रसिद्ध उद्योगपती असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे आहे. संघ स्वयंसेवक म्हणून ते प्रसिद्ध असून संघाच्या अनेक उपक्रमामध्येही त्यांचा सहभाग असतो. पवार कुटुंब पुरोगामी असून कायम संघ आणि त्यांच्या विचारांवर टीका करत आला आहे.
दिवंगत अजित पवार हे भाजपसोबत गेले. सत्ता स्थापन केली मात्र त्यांनी कधीही संघ विचारांचा स्वीकार केला नाही. असे असताना सुप्रिया सुळे यांनी संघ परिवारात आपली मुलगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावरून यासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे. तर शरद पवार यांचा पक्ष एनडीए मध्ये सहभागी होऊन सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार अशी ही चर्चा आहे. त्यामुळे या लग्नामध्ये राजकीय गणित तज्ञांना असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सुप्रिया सुळे सोशल मीडियावर केलल्या पोस्टमध्ये म्हणाल्या होत्या की, “सांगायला अतिशय आनंद होत आहे की आमची मुलगी रेवती हिचा विवाह अरुण लखानी आणि वंदना लखानी यांचा सुपूत्र सारंग याच्याशी निश्चित झाला आहे. मुलीच्या लग्नात मुख्यमत्र्यांनी मध्यस्थी केली अशी चर्चा आहे असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला, ज्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. तसेच त्यांनी या लग्नाची घोषणा ३० तारखेला होणार होती असेही सागितले. “खरंतर अनेक महिने ही चर्चा चालली होती. रेवती आणि सारंग हे जवळपास गेले वर्षभर एकमेकांना ओळखतात.
माझं भाग्य आहे की माझे सगळेच भाऊ, म्हणजे मला सहा भाऊ आहेत, त्या सहाही भावांनी या नात्याला आशीर्वाद दिला आहे. मी माझं भाग्य समजते की दादा असतानाच हे लग्न ठरलं होतं. खरंतर दुर्दैव हे आहे की दादा आपल्यातून २८ तारखेलाच गेला, नाहीतर ही घोषणा सगळं कुटुंबच ३० तारखेला करणार होतं,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कोण आहेत लखानी?
सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचे लग्न सारंग अरुण लखानी यांच्याशी होणार आहे. सारंग लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग अरुण लखानी हे बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
पाणी शाश्वत प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन आणि रस्ते पायाभूत सुविधांच्या विकासात ही कंपनी कार्यरत आहे. गेल्या आठ वर्षांपासून सारंगही या कंपनीचं काम पाहत असून ते कार्यकारी संचालक पदी आहेत. कौटुंबिक व्यवसायात सक्रिय होण्याआधी त्यांनी बिझनेस डेव्हलोपमेंट कन्सल्टंट म्हणून मॉडर्न हायड्रोजन कंपनीत काम केले आहे.

