नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती नागपूरची सून होणार आहे. नागपूर येथील एका व्यावसायिकाचा मुलगा सारंग लखानी यांच्याशी रेवती यांचे लग्न होणार आहे. राम नवमीनिमित्त लखानी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भव्यदिव्य सोहळा असतो. यासाठी सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती तीन दिवसांआधीच आजोबा शरद पवारांसोबत नागपूरला आली. तर सुप्रिया सुळेंनी गुरुवारी रामनवमीच्या दिवशी अरुण लखानी यांच्या घरी भेट दिली. या कार्यक्रमात राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये चांगल्याच गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं.

विजय सुळे यांनी शेअर केली होती लग्नाची पोस्ट!

सुप्रिया सुळे यांचे चिरंजीव विजय सुळे यांनी काही दिवसांआधी सोशल मीडियावर अभिनंदनपर संदेश पोस्ट करून ही गुड न्यूज दिली आहे. यात रेवती आणि सारंग यांचा फोटो शेअर करीत, “बहीण आणि मेहुणे यांचे अभिनंदन” अशा कॅप्शनसह हार्ट आणि रिंगचे इमोजी मेसेज टाकून सर्वाना सुखद धक्का दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनीही सोशल मीडियावर असाच संदेश आणि फोटो शेअर केला होता.

कोण आहेत सारंग लखानी?

रेवती सुळे यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी मिळवली. बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी प्रथमच आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. सारंग लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सध्या सारंग लखानी त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली फर्म विश्वराज ग्रुपमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. ते उत्तम बॅडमिंटनपटू असून, त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहे.

माजी खासदार दत्ता मेघे यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर शरद पवार यांनी मेघे यांच्या परिवाराची भेट घेतली. त्यावेळी रेवती सुळेही नागपूरला आल्या होत्या. त्यानंतर त्यांनीही लखानी यांच्या घरी भेट दिली. तर सुप्रिया सुळे यांनी राम नवमीनिमित्त असलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळचे छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. यात सुप्रिया सुळे लखानी परिवारासोबत मुलीसह आहेत. त्यांचे पतीही सोबत आहेत. यावेळी नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्यांच्या चर्चा रंगल्या होत्या.