चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मेंडकी येथील रोशन कुळे (३६) या शेतकऱ्याने सावकाराच्या तगाद्यामुळे स्वत:ची किडनी कंबोडिया या देशात जावून आठ लाखात विकली. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे. आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करतो. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. लोकसत्ताची बातमी ट्वीट करीत खासदार सुळे यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

सध्याच्या काळात शेतकऱ्यांच्या अडचणींची अक्षरशः परिसीमा झाली असून त्यांच्यावर मूत्रपिंड विकण्याची वेळ आली. चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुळे या शेतकऱ्याने खासगी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून अखेर आपली किडनी विकून कर्ज काही प्रमाणात फेडल्याची ही घटना अतिशय दुर्दैवी आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे.

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. उर्फ आबा पाटील यांनी शेतकऱ्यांना नाडणाऱ्या खासगी सावकारांना ‘कोपरापासून ढोपरापर्यंत’ सोलून काढायची घोषणा केली होती. त्यानंतर मुजोर खासगी सावकारांच्या विरोधात कठोर कारवाया करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. राज्यातील शेतकऱ्यांचे अशा पद्धतीने रक्षण करणारे, त्यांच्या अडीअडणीत खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे सरकार एकेकाळी महाराष्ट्रात अस्तित्वात होते. मात्र सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी नाही असेच काहीचे चित्र राज्यात सर्वत्र दिसत आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, कृपया या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी. अतिवृष्टीमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्याला तातडीने आर्थिक मदत देऊन उभे करण्याची गरज आहे. जर त्याला आपण आता आर्थिक आधार दिला नाही, तर नाईलाजाने तो पुन्हा खासगी सावकारीच्या जाळ्यात अडकेल. यातून मोठे आर्थिक, सामाजिक प्रश्न उद्भवू शकतील. म्हणून आपण तातडीने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर करुन ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी.

यासोबतच सध्या राज्यातील काही भागांमध्ये खासगी सावकारांचे प्रताप वाढले असून शेतकरी नाडला जात आहे. आपण खासगी सावकारीच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करावी. यासोबतच शेतकऱ्यांपर्यंत सहज पद्धतीने पोहोचेल, त्यांना आधारभूत होईल अशा वित्तपुरवठ्याचे पर्याय उपलब्ध करावेत अशीही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.