गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि अत्यंत दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. तालुक्यातील नारगुंडा या आदिवासी गावातील एका होतकरू तरुणाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली आहे. सुरज विष्णू पुंगाटी याने सोलापूरच्या डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवीची (एमबीबीएस) अंतिम वर्षाची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली असून गावातून डॉक्टर होणारा तो पहिलाच युवक ठरला आहे. पुण्यातील ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ (एलएफयू) या संस्थेचे मोफत मार्गदर्शन आणि जिद्द याच्या बळावर त्याने हा खडतर प्रवास पूर्ण केला.
शेतकरी कुटुंबातील संघर्ष ते वैद्यकीय प्रवास
सुरजचे आई-वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. नरगुंडासारख्या सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या भागात जन्मलेल्या सुरजचे प्राथमिक शिक्षण हेमलकसा येथील प्रसिद्ध लोकबिरादरी शाळेत झाले. त्यानंतर सातवी ते दहावीचे शिक्षण त्याने नागपूरच्या मुंडले पब्लिक स्कूलमध्ये पूर्ण केले. लहानपणापासूनच डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी लागणारा खर्च त्याच्या गरीब कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होता.
दुर्गम भागात आरोग्यसेवांची काय अवस्था असते, हे मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे डॉक्टर झाल्यानंतर माझ्या गावाकडील आणि गडचिरोलीतील आदिवासी बांधवांची सेवा करायची, हाच माझा मुख्य हेतू आहे, असे सुरजने सांगितले.
‘उलगुलान’चे पाठबळ
आर्थिक अडचणींमुळे सुरजचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा वेळी त्याला पुण्यातील ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ या संस्थेची माहिती मिळाली. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवी तत्त्वावर स्थापन केलेली ही संस्था वंचित आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेसाठी (नीट) मोफत निवासी प्रशिक्षण देते.
सुरजने संस्थेच्या ‘उलगुलान’ प्रकल्पात प्रवेश घेतला. येथे त्याला दोन वर्षे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांचे सखोल प्रशिक्षण मिळाले. देशात टाळेबंदी लागू असतानाही संस्थेने ऑनलाइन वर्ग, मार्गदर्शन आणि मानसिक आधार देत त्याचे शैक्षणिक सातत्य कायम ठेवले.
गडचिरोलीच्या आरोग्य व्यवस्थेसाठी आशेचा किरण
गडचिरोली जिल्ह्यात आजही बालमृत्यू, कुपोषण आणि डॉक्टरांची रिक्त पदे हे गंभीर प्रश्न आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक भाषा, संस्कृती आणि भौगोलिक परिस्थितीची जाण असलेला डॉक्टर मिळणे ही या भागासाठी मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी २०१५ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेचे मेळघाट आणि गडचिरोली परिसरातून प्रत्येकी १०० आदिवासी डॉक्टर घडवण्याचे उद्दिष्ट आहे. त्या महत्त्वाकांक्षी प्रवासात सुरज पुंगाटी हा गडचिरोली जिल्ह्यातील पहिला, तर संस्थेचा एकूण दहावा आदिवासी डॉक्टर ठरला आहे. त्याच्या या यशामुळे नरगुंडासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.
