गडचिरोली : सूरजागड खाणपट्ट्यातील प्रस्तावित नव्या खाणीला स्थानिक ग्रामसभा आणि नागरिकांनी विरोध दर्शविलेला असतानाही काही दलालांकडून ग्राम कोस समितीचे ठराव बेकायदेशीर मार्गाने मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आर्थिक प्रलोभने, दबावाचे राजकारण आणि संशयास्पद हालचालींमुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जावेली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आर्थिक प्रलोभनांचा आरोप; ग्रामसभेला डावलून ठराव मिळविण्याचा प्रयत्न
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ओम साई राम प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाखाली काही दलाल ग्राम कोस समितीतील मोजक्या सदस्यांना हाताशी धरून ठराव मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी आर्थिक प्रलोभने दाखविली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामसभेची संमती नसताना काही व्यक्ती स्वतःच्या आर्थिक हितासाठी नियमबाह्य पद्धतीने हालचाली करीत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.
यापूर्वीही दबावतंत्राचा आरोप; अवैध वृक्षतोडीचाही मुद्दा ऐरणीवर
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीही कंपनीशी संबंधित काही व्यक्तींनी गावातील नागरिकांवर दबाव टाकून परवानगी मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच संबंधित परिसरात अवैध वृक्षतोड सुरू असल्याच्याही तक्रारी समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप अधिकच वाढला आहे. या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सत्तर ग्रामसभांचा एकमुखी विरोध; तरीही दलालांची कथित हालचाल सुरू
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी नैणवाडी परिसरात सूरजागड पट्ट्यातील तब्बल सत्तर ग्रामसभांचे प्रतिनिधी आणि नागरिक एकत्र आले होते. या बैठकीत उत्खननाला एकमुखी विरोधाचा ठराव करण्यात आला. ग्रामसभेचा एवढा स्पष्ट विरोध असतानाही काही दलालांकडून कथितरीत्या परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याने नेमके कोणाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू आहे, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत.
ग्रामसभेच्या अधिकारांच्या संरक्षणाची मागणी; दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा
ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात ग्रामसभा व ग्राम कोस समितीच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. गावाच्या भवितव्याशी संबंधित कोणताही निर्णय हा संपूर्ण ग्रामसभेच्या उपस्थितीत, पारदर्शक आणि कायदेशीर प्रक्रियेनुसारच व्हावा, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. नियमबाह्य मार्गाने कोणताही ठराव मंजूर होऊ नये तसेच संबंधित दलाल, मध्यस्थ आणि त्यांना साथ देणाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी सैनू लेकामी, नामदेव लेकामी, तनेश गोटा, नामसू हिचामी, बिरसा हेडो, मधुकर मट्टमी, रामसू नरोटे, प्रवीण लेकामी, रमेश हेडो, सचिन लेकामी, लालू पदा, झुरु तेलामी, मंगेश वड्डे, पेका लेकामी, अनिल काकडी, मंगू गोटा, लालू तेलामी, सत्तू झोरे, सत्तू तुमरेट्टी, सवजी झोरे, रावजी कोवसे, जीवन केरकेडा, वासूदेव हिचामी, भीमा पदा, मनोज गोटा, तोंदे तिम्मा, दिलीप लेकामी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
