लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : जहाल नक्षल नेता नांगसू मनकू तुमरेटी उर्फ गिरीधर याने पत्नी संगीतासह आत्मसमर्पण केल्यानंतर आठ दिवसांत आणखी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे (२८,रा. झारेवाडा ता. एटापल्ली) व शशीकला उर्फ चंद्रकला उर्फ सुनंदा उर्फ मनीषा उईके (२९,रा. कटेझरी ता. धानोरा) अशी त्यांची नावे असून दोघांवर १६ लाखांचे बक्षीस होते.

नक्षलवाद्यांच्या कंपनी क्रमांक १० च्या प्लाटून पार्टी कमिटी सदस्य व एरिया कमिटी सदस्य म्हणून त्या दोघी काम करायच्या. बाली ही २०१० मध्ये नक्षल चळवळीत सदस्य म्हणून गट्टा दलममध्ये भरती झाली होती. वर्षभरातच तिची अहेरी दलममध्ये बदली झाली. २०१६ मध्ये अहेरी दलममधून कंपनी क्र. १० मध्ये बदली होऊन कार्यरत झाली. २०२१ मध्ये तिला प्लाटून पार्टी कमिटी सदस्य व एरिया कमिटी सदस्य म्हणून बढती मिळाली. तिच्यावर एकूण २१ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १० चकमक, जाळपोळ, अपहरण प्रत्येकी एक व इतर ९ गुन्ह्यांचा समावेश आहे. शशीकला ऊईके हिने २०११ मध्ये टिपागड दलममधून नक्षल चळवळीत प्रवेश केला. कंपनी क्र. ४ व नंतर १० मध्ये तिची बदली झाली. २०२३ मध्ये तिला बढती मिळाली. प्लाटून पार्टी कमिटी सदस्य व एरीया कमिटी सदस्य या पदावर ती कार्यरत होती. तिच्यावर ८ गुन्हे दाखल असून सहा चकमक व दोन इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.

आणखी वाचा-“ओवेसींचे संसद सदस्‍यत्‍व रद्द करा,” नवनीत राणा यांचे राष्‍ट्रपतींना पत्र; म्हणाल्या, “जय पॅलेस्‍टाईनच्या घोषणा देऊन त्यांनी…”

दोघींना मिळणार प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून बाली नरोटे व शशीकला उईके या दोघींना प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. याशिवाय घरकुल व इतर योजनांचा लाभ देखील दिला जाणार आहे. गडचिरोली शहरात आत्मसमर्पितांसाठी नवजीवन वसाहत निर्माण करण्यात आली आहे. याठिकाणी आत्मसमर्पण केलेले माजी नक्षल सन्मानाने जीवन जगत आहे. त्यांना शासनाच्या सर्व सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलीस प्रशासनाने राबवलेल्या प्रभावी आत्मसमर्पण योजनेमुळे नक्षल चळवळीतील अनेक नेत्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामुळे या हिंसक चळवळीचे कंबरडे मोडले आहे.

अडीच वर्षांत १९ जणांनी सोडली गुन्हे चळवळ

पोलिसांच्या नक्षल आत्मसमर्पण योजनेंतर्गत २०२२ पासून आतापर्यंत अडीच वर्षांत १९ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील,उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी यासाठी परिश्रम घेतले. नक्षल्यांनी गुन्हेगारी चळवळ सोडून आत्मसमर्पण करुन सामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surrender of two famous women naxalites with a reward of 16 lakhs ssp 89 mrj
Show comments