Why Ishan Kishan is replacing Shreyas Iyer in… / नागपूर : भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने नागपूरमधील भारत–न्यूझीलंड पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी महत्त्वाची घोषणा केली. या सामन्यात इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. उशिरा संघात समावेश करण्यात आलेल्या श्रेयस अय्यरपेक्षा इशान किशनला प्राधान्य देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.
सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सूर्यकुमार म्हणाला, “इशान किशन हा आमच्या टी-२० विश्वचषकाच्या योजनांचा भाग आहे. त्याची निवड आधीच संघात झाली असल्याने त्याला संधी देणे ही आमची जबाबदारी आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्याला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती; मात्र या काळात त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी केली आहे.” तिलक वर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात निर्माण झालेली पोकळी इशान किशन भरून काढू शकतो, असेही कर्णधाराने नमूद केले. तिलक वर्मासारखाच ‘लाइक-फॉर-लाइक’ पर्याय इशान असल्याने तिसऱ्या क्रमांकासाठी त्याची निवड योग्य ठरते, असे संघाचे मत आहे.
“इशानची निवड आधीच टी-२० विश्वचषकासाठी करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्याला प्राधान्य मिळणे साहजिक आहे. जर चौथा किंवा पाचवा क्रमांकाचा प्रश्न असता, तर परिस्थिती वेगळी असती. दुर्दैवाने तिलक उपलब्ध नाही; त्यामुळे सध्या इशान हाच आमचा सर्वोत्तम पर्याय आहे,” असे सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले.
उल्लेखनीय आहे की, इशान किशनने भारतासाठी शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २८ नोव्हेंबर २०२३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. दीर्घकाळ संघाबाहेर राहिल्यानंतर, देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर २७ वर्षीय इशानने पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका टी-२० विश्वचषकापूर्वीची भारताची अंतिम टी-२० मालिका असल्याने, इशानसाठी महत्त्वाची संधी ठरणार आहे.
क्रिकेट हा सांघिक खेळ
सूर्यकुमार यादव सध्या फॉर्ममध्ये नाही. मात्र याबाबत चिंता नसल्याचे स्वत: सूर्यकुमार यादवने सांगतिले. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. टेनिस किंवा बॅडमिंटनसारखा एकल खेळ नाही. मी संपूर्ण संघाचे नेतृत्व करतो. प्रत्येक खेळाडू योगदान देत असतो. त्यामुळे माझा खेळ चांगला आहे की नाही हा मुख्य मुद्दा नाही. सर्व खेळाडू एकसंघ होऊन खेळले तर नक्कीच चांगली कामगिरी होऊ शकते, असे परखड मत सूर्यकुमार यादवने व्यक्त केले.
