ndia vs New Zealand T20 / नागपूर : टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी होणारी भारत–न्यूझीलंड पाच सामन्यांची टी-२० मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना २१ जानेवारी रोजी नागपूर येथे खेळविला जाणार असून, या लढतीकडे दोन्ही संघांच्या तयारीचा आरसा म्हणून पाहिले जात आहे.

विश्वचषकापूर्वी प्रयोगांना वाव

टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका केवळ द्विपक्षीय विजयापुरती मर्यादित नसून, संभाव्य संघसंयोजन, फलंदाजी क्रम, गोलंदाजीची अचूक जुळवाजुळव आणि दबावाखाली खेळण्याची क्षमता तपासण्याची मोठी संधी ठरणार आहे. विशेषतः भारतासाठी मधल्या फळीत स्थैर्य, फिनिशरची भूमिका आणि पॉवरप्लेतील गोलंदाजी हे मुद्दे निर्णायक ठरतील.

नागपूरची खेळपट्टी पारंपरिकरित्या सुरुवातीला फलंदाजांना मदत करणारी, तर सामन्याच्या उत्तरार्धात फिरकीपटूंना अनुकूल ठरते. त्यामुळे पहिल्या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. संध्याकाळी दव पडल्यास दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे आव्हानात्मक ठरू शकते, याचाही विचार संघ व्यवस्थापनाला करावा लागणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला सूर्यकुमार यादवने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने नागपूरच्या संत्रीचाही उल्लेख केला.

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

नागपूरच्या खेळपट्टीबाबत विचारल्यावर सूर्यकुमार यादवने ती चांगली असल्याचे सांगितले. नागपूरची खेळपट्टी हिरवीगार आहे, केवळ संत्री नाही लावली, अशा उपरोधिक शब्दात सूर्यकुमार यादवने खेळपट्टीवर भाष्य केले. नागपूरमधील सामना नवी सुरूवात करण्यासाठी उत्तम संधी असल्याचेही कर्णधाराने सांगितले. सूर्यकुमार यादव सध्या फॉर्ममध्ये नाही. मात्र याबाबत चिंता नसल्याचे स्वत: सूर्यकुमार यादवने सांगतिले.

क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. टेनिस किंवा बॅडमिंटनसारखा एकल खेळ नाही. मी संपूर्ण संघाचे नेतृत्व करतो. प्रत्येक खेळाडू योगदान देत असतो. त्यामुळे माझा खेळ चांगला आहे की नाही हा मुख्य मुद्दा नाही. सर्व खेळाडू एकसंघ होऊन खेळले तर नक्कीच चांगली कामगिरी होऊ शकते, असे परखड मत सूर्यकुमार यादवने व्यक्त केले.

उल्लेखनीय आहे की, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत २५ टी-२० सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने १४ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडला १० सामन्यांत यश आले आहे; तसेच एक सामना टाय झाला आहे. भारताचा काहीसा वरदर्जा रेकॉर्ड असूनही न्यूझीलंडकडे कोणत्याही क्षणी सामना वळवण्याची ताकद आहे, त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक सामना अत्यंत कडक व स्पर्धात्मक अपेक्षित आहे.