चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सायबर हल्ला करून ३ कोटी ७० लाख रुपये हरियाणा, दिल्ली, पंजाब, नोएडा आणि गुडगाव येथील २७ खातेदारांच्या खात्यात जमा करण्यात आले. ही सर्व खाती सायबर हल्लेखोरांनी भाड्याने घेतली असावीत, अशी शंका पोलिसांनी वर्तवली आहे. या सर्व खातेदारांची ‘केवायसी’ आणि ‘ईमेल आयडी’ची माहिती संबंधित बँकांकडून पोलिसांनी मागविली आहे. नागपुरातील सॉफ्टवेअर कंपनी ट्रस्ट फिनटेक लि. तसेच यापूर्वी बँकेची सॉफ्टवेअर यंत्रणा हाताळणाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एक पथक गठित केले आहे. ही चोरी अतिशय धूर्तपणे केली गेली. या घटनेनंतर बँकेची ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी’ प्रणाली बंद पडली आहे. चंद्रपूर जिल्हा बँक आता आयडीबीआय बँकेसोबत यासाठी करार करणार असल्याची माहिती आहे. या सायबर हल्ल्यामागे नेमके कोण आहेत, याचा शोध घेण्यासाठी बँकेने व पोलिसांनी सॉफ्टवेअर तज्ज्ञांकडून सल्ला घेतला. त्यानुसार लवकरच त्रयस्थ कंपनीकडून या संपूर्ण यंत्रणेचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ केले जाणार असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी दिली. या सायबर हल्ल्याच्या घटनेनंतर बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, कल्याणकर यांनी बैठका घेऊन ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, यावर चर्चा केली. शहरातील आयकर सल्लागारांकडूनही माहिती घेतली.

‘या’ खातेदारांची रक्कम लंपास

आयडीबीआय बँक, श्री आनंद नागरी सहकारी बँक, विठ्ठल बोरकर, शिक्षक सहकारी बँक, जनता को. ऑपरेटिव्ह बँक, गोवर्धन को-ऑप. बँक, शैला तुळशीराम, रोहित ट्रेडर्स, एमईसीबी मुख्य कार्यालय, अशोक ट्रेडर्स, तिरूपती अर्बन को ऑपरेटिव्ह बँक, माधुरी भाऊराव, वरभे पेट्रोल पंप, सदानंद कवठे, राधा ट्रेडर्स यांच्यासह अन्य खातेदारांच्या खात्यातून सायबर हल्लेखोरांनी रक्कम लंपास केली आहे.

सायबर हल्ल्याच्या तपासासाठी एक पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाला सायबर हल्ला व ऑनलाइन गुन्हे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हे पथक लवकरच हरियाणा येथे रवाना होणार आहे. यामागे नेमके कोण आहेत, याचा शोध घेतला जात आहे.- मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspected of renting bank accounts for cyber attacks chandrapur news rsj 74 amy