नागपूर : महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या अकोला विभाग नियंत्रक कार्यालयाने संपकरी कर्मचाऱ्यांना वेतन दिल्यामुळे तेथील विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर आणि इतर काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री नागपूरचे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांचेही याच कारणामुळे निलंबन करण्यात आले. राज्यातील या दुसऱ्या कारवाईमुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी नागपूरसह राज्यभरातील एसटी कर्मचारी सुमारे साडेपाच ते सहा महिने संपावर होते. त्यामुळे एसटीची सेवा कोलमडली होती. या काळात महामंडळाकडून राज्यभरातील विभाग नियंत्रक कार्यालयांना वेळोवेळी मार्गदर्शक सूचना दिल्या जात होत्या. त्यात संपकाळातील कर्मचाऱ्यांना वेतन न देण्याचे स्पष्ट आदेश होते; परंतु अकोलापाठोपाठ नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयाने सुमारे २० ते २१ कर्मचाऱ्यांना संपापूर्वीच्या शिल्लक रजेचे वेतन दिले. यामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान आणि वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली, असा ठपका ठेवत नागपूरचे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांना निलंबित करण्यात आले.

विशेष म्हणजे, याप्रकरणी बेलसरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे आणि अकोला विभाग नियंत्रकांचे निलंबन करण्यात आल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’नेच प्रकाशित केले होते. नागपूर विभाग नियंत्रकांना निलंबित केल्याच्या वृत्ताला एसटी महामंडळाचे नागपूर व अमरावती विभागाचे उपमहाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दुजोरा दिला. मात्र, अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

चौघांवर टांगती तलवार

सध्या नागपूर विभाग नियंत्रकाची अतिरिक्त जबाबदारी एका अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र, या अधिकाऱ्यासह चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर याच प्रकरणी कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्याचा अहवाल महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे.