लोकसत्ता टीम

गडचिरोली : नक्षल सप्ताहात पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन आणखी एका आदिवासी नागरिकाची नक्षल्यांनी हत्या केली. ही घटना तालुक्यातील अतिदुर्गम मीरगुडवंचा येथे ३० जुलै रोजी रात्री घडली. सध्या नक्षल सप्ताह सुरु असून आठवडाभरात दोन निष्पाप नागरिकांच्या हत्या केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

लालू मालू दुर्वा (४०,रा. मीरगुडवंचा ता. भामरागड) असे मृताचे नाव आहे. तो एका पोलीस अंमलदाराचा नातेवाईक आहे. २८ जुलैपासून ३ ऑगस्टपर्यंत नक्षल सप्ताह सुरु आहे. यात पोलीस जवानांवर हल्ला, भूसुरुंग स्फोट, खंडणी वसुली, निष्पाप नागरिकांच्या हत्या अशी कामे नक्षली करतात. नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला आरेवाडा (ता. भामरागड) येथे जयराम कोमटी गावडे (४०) या आत्मसमर्पित नक्षल्याची गोळ्या झाडून हत्या करत नक्षल्यांनी दहशत निर्माण केली होती.

आणखी वाचा- भाजप आमदार श्वेता महालेंच्या बॉडीगार्डने स्वतःवर झाडली गोळी

त्यानंतर ३० जुलै रोजी रात्री मीरगुडवंचा येथे लालू दुर्वा यास झोपेतून उठवून गावाबाहेर नेले व तेथे कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून संपविले. एकाच आठवड्यात नक्षल्यांनी दोन निष्पाप नागरिकांची हत्या केल्याने परिसरात दहशत पसरली आहे. पोलिसांनी नक्षल्याविरोधात चालविलेल्या आक्रमक अभियानामुळे जिल्ह्यात ही चळवळ कमकुवत झाली आहे. काही दिवसांपूर्वी वांडोली येथे झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले होते. त्यामुळे नैराश्येतून ते या कृती करत आहेत. असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले आहे.

मृतदेहाजवळ सोडली चिठ्ठी

दरम्यान, मृतदेहाजवळ नक्षल्यांनी एक चिठ्ठी सोडली, त्यात लालू धुर्वा हा पोलिसांचा खबरी होता, त्याच्यामुळे आम्हाला एकदा कॅम्प सोडून जावे लागले होते, असा उल्लेख आहे. या चिठ्ठीवर पिपल्स लिबरेशन गुर्रिला पार्टी असा उल्लेख आहे. ही चिठ्ठी ताब्यात घेऊन भामरागड पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

आणखी वाचा-अमरावती : ‘विदेशी नोटा भारतीय चलनात बदलून देता का?’ आंतरराज्‍यीय टोळीतील तीन महिला…

नक्षलविरोधी अभियान तीव्र करणार – पोलीस अधीक्षक

२८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवादी शहीद सप्ताह साजरा करतात. २५ जुलै रोजी भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथे जयराम कोमटी गावडे याची नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या गोळीने हत्या केली होती. त्यानंतर ही दुसरी हत्या आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. प्रचंड नैराश्यामुळे नक्षलवादी निरपराध नागरिकांचा बळी घेत असल्याचे सांगितले. त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करणार असल्याचेही ते म्हणाले.