नागपूर : कोरोनाचे नागपुरात दोन बळी गेल्याची घटना ताजी असतानाच येथे ‘स्वाईन फ्लू’चे ही रुग्ण वाढताना दिसत आहेत. नागपूर जिल्ह्यात ‘स्वाईन फ्लू’चा एक मृत्यू झाला असून आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. दरम्यान नागपुरात कोरोनापाठोपाठ स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढू लागल्याने शासकीय रुग्णालये दक्ष झाली आहे.
नागपूरात तीन दिवसांत कोरोनाचे दोन बळी गेले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली असतांनाच स्वाईन फ्लूही डोके वर काढत असल्याचे संकेत आहे. नागपुरात दगावलेला पुरुष संवर्गातील स्वाईन फ्लूचा ६० वर्षीय रुग्ण सावनेरचा आहे. स्वाईन फ्लू सदृश लक्षणे असल्याने प्रथम नातेवाईकांनी त्यांना जवळच्या दवाखान्यात उपचार केले. परंतु, त्रास वाढतच असल्याने त्याला रुग्णालयात हलवले गेले. उपचारादरम्यान त्याचा मे महिन्याच्या शेवटी मृत्यू झाला.
नागपुरातील हा स्वाईन फ्लूचा २०२५ मधील पहिला मृत्यू आहे. आरोग्य विभागाच्या पूणे कार्यालयातील नोंदणीनुसार नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात या आजाराचे १ जानेवारी ते ५ जून २०२५ दरम्यानच्या काळात एकूण २७ रुग्ण आढळले. त्यापैकी सर्वाधिक १४ रुग्ण हे केवळ नागपूरच्या शहरी भागातील आहेत. तर नागपूर ग्रामीणलाही ६ रुग्ण नोंदवले गेले. त्यापैकी नागपूर ग्रामीणच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर गोंदिया जिल्ह्यात १ रुग्ण, चंद्रपूर जिल्ह्यात ३ रुग्ण, भंडारा जिल्ह्यात १ रुग्ण, गडचिरोली जिल्ह्यात १ रुग्ण नोंदवला गेला आहे. आढळलेल्या रुग्णांपैकी बरेच रुग्ण मे महिन्यात आढळले आहेत. तर बहुतांश रुग्ण बरे होऊन घरी पोहचल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
‘स्वाईन फ्लू’ला पोषक वातावरण
नागपूर जिल्ह्यात उन पावसाचा खेळ सुरू असून हे वातावरण ‘स्वाईन फ्लू’साठी पोषक आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात हे रुग्ण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाला दगावलेल्या व नवीन सापडणाऱ्या स्वाईन फ्लूच्या रुग्णाची माहिती कळताच त्यांनी तातडीने रुग्णाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत प्रतिबंधात्मक उपाय सुरू केल्याचा दावा केला. तसेच जनजागृतीही केली जात असल्याचे नागपूर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
अशी आहेत लक्षणे
एच १, एन १ अथवा स्वाईन फ्लूच्या इतर उपप्रकारात रुग्णाला ताप, खोकला, घशाचा संसर्ग, डोकेदुखी इत्यादी लक्षणे आढळतात. बहुतेक रुग्ण सौम्य लक्षणे दाखवतात व बरे होतात. परंतु, काही रुग्णांमध्ये या आजाराची गंभीर लक्षणे देखील दिसू शकतात.