अकोला : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतिहासात आपले नाव नोंदवू शकतात. त्यांनी औरंगजेबची कबर उखडून फेकावी, त्या ठिकाणी आम्ही मूत्रालय उभारू, असे वक्तव्य हैदराबाद येथील भाग्यनगरचे आमदार टी. राजा सिंह यांनी केले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र व राज्य सरकारवरही जोरदार टीका केली.

अकोल्यातील गोरक्षण मार्गावरील एकविरा मैदानावरील हिंदू राष्ट्र जागृती सभेत ते बोलत होते. हिंदू राष्ट्राच्या विविध मुद्द्यावर भाष्य करीत टी. राजा सिंह यांनी केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

‘ते भाजपला मत देणार नाहीत, याची जाण ठेवा’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अल्पसंख्याक समाजासाठी कितीही विकासाच्या, लाभाच्या योजना आणल्या तरी ते भाजपला मत देणार नाहीत, याची जाण त्यांनी ठेवावी. देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबची कबर उखडून टाकावी. तर त्यांचे नाव इतिहासात नोंदवल्या जाईल. त्या ठिकाणी मूत्रालय उभारण्याची व्यवस्था आम्ही करू, असे टी. राजा सिंह म्हणाले.

‘विकास नसला तरी चालेल, पण हिंदू राष्ट्र घोषित करा’

आम्हाला विकास नसला तरी चालेल. रस्ते २० वर्षांपर्यंत खड्डेमय असले तरी हरकत नाही. पण सर्वात पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक काम करायचे आहे. त्यांच्या तोंडून, ”आजपासून भारत देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करीत आहे,” हे ऐकण्यासाठी देशातील जनता आतुर झाली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. ते चांगल्या भाषेत देशद्रोहींना उत्तर देत होते. आम्ही त्यांच्याकडून शिकलो आहोत, असे टी. राजा सिंह यांनी सांगितले.

‘हिंदूंच्या रक्षणार्थ देशसेवेचे व्रत घ्या’

देशात अलीकडे वाढलेले ‘लव्ह जिहाद’, गोवंश तस्करी आणि कत्तलीचे वाढते प्रमाण पाहता त्या विरोधात प्रत्येक हिंदूंनी आपल्या समाजाच्या रक्षणासाठी आठवड्यातून एक दिवस कार्य करुन “लव्ह जिहाद’ तसेच गोवंश कत्तलीचे अड्डे शोधून त्याची माहिती पोलिसांना द्यावी. तक्रारी नंतरही पोलिसांनी लव्ह जिहाद आणि गोवंश कत्तलीविरोधात कारवाई न केल्यास दुसरा मार्ग स्वीकारण्यात येईल. पण आधी हिंदूंच्या रक्षणार्थ देशसेवेचे व्रत म्हणून हे कार्य करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन टी. राजा सिंह यांनी केले.

‘हिंदू समाज विभागला गेला, तर संख्या कमी होते’

महाराष्ट्रातील हिंदू घाबरणारा नाही, तर घाबरवणारा व्हावा. जातीवादाच्या नावावर हिंदू समाज आपसात वाटला जात आहे. हिंदू समाज विभागला गेला, तिथे त्यांची संख्या कमी होत गेली, हा इतिहास आहे. दुसरीकडे अल्पसंख्याक समाज एकजूट होऊन त्यांची संख्या आणि प्राबल्य वाढवत आहे. याला आळा घालण्यासाठी देशाचे पंतप्रधान मोदी यांनी ‘हम दो हमारा एक किंवा दो’ हा संततीनियमाचा कायदा सर्वांसाठी लागू करावा, अशी मागणी आपण त्यांच्याकडे करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. सभेला मोठा जनसमुदाय उसळला होता.