नागपूर : भारतीय लष्कराच्या टी-९० ‘भीष्म’ रणगाड्यांसाठी आवश्यक असलेल्या हाय स्ट्रेंथ अॅल्युमिनियम अॅलॉय आर्मर प्लेट्सची दोन प्रकारांत स्वदेशी निर्मिती अंबाझरी आयुध निर्माणीत करण्यात आली असून, त्यांची पहिली खेप मंगळवारी रवाना करण्यात आली.
आयातीवरील अवलंबित्व कमी होणार
आत्मनिर्भर भारत आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत अंबाझरी आयुध निर्माणीने प्रथमच पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे या आर्मर प्लेट्स विकसित केल्या आहेत. आतापर्यंत टी-९० रणगाड्यांसाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट प्रकारच्या आर्मर प्लेट्सची परदेशातून आयात केली जात होती. रशियाकडून होणाऱ्या आयातीवर परिणाम झाल्याने चेन्नईतील आवडी येथील हेवी व्हेइकल फॅक्टरीमध्ये टी-९० रणगाड्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर स्वदेशी पर्याय विकसित करणे महत्त्वाचे ठरले.
उच्च दर्जाचे बैलिस्टिक संरक्षण
अंबाझरी आयुध निर्माणीने विकसित केलेल्या या हाय स्ट्रेंथ अॅल्युमिनियम अॅलॉय आर्मर प्लेट्स उच्च सामर्थ्याच्या असून, लष्करी वाहनांना आवश्यक असलेले बैलिस्टिक संरक्षण देण्यासाठी त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्लेट्सच्या विकासामुळे रणगाड्यांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या घटकाची देशांतर्गत उपलब्धता सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दृष्टीनेही या निर्मितीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘भीष्म’ रणगाड्याची वैशिष्ट्ये
टी-९० ‘भीष्म’ हा भारतीय भूदलाच्या चिलखती दलातील प्रमुख रणगाड्यांपैकी एक आहे. या रणगाड्यावर १२५ मिमीची मुख्य तोफ असून, स्वयंचलित गोळे भरण्याची यंत्रणा आहे. त्यामुळे वेगाने गोळीबार करणे शक्य होते. रणगाड्याच्या तोफेतून ‘इनवार’सारखी लेझर-मार्गदर्शित क्षेपणास्त्रेही डागता येतात. उपलब्ध माहितीनुसार, या क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांना भेदण्याची क्षमता आहे.
पहिली खेप रवाना
अंबाझरी आयुध निर्माणी येथे विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी आर्मर प्लेट्सची पहिली खेप मंगळवारी रवाना करण्यात आली. या वेळी इंडिया लिमिटेडचे संचालक (ऑपरेशन्स) विजयकुमार अय्यर, ओएफएजेचे कार्यकारी अधिकारी अजय कुमार येरपुडे तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. प्लेट्सच्या निर्मिती प्रक्रियेसाठी आवश्यक तांत्रिक आणि उत्पादन सुविधांच्या उभारणीत हैदराबादस्थित भारत सरकारच्या संबंधित संरक्षण संस्थेचे सहकार्य मिळाले. स्वदेशी बनावटीच्या या प्लेट्समुळे टी-९० रणगाड्यांच्या उत्पादन साखळीतील आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.
