चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील पर्यटन हंगामाला ३० जूनपासून तात्पुरता विराम मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात जंगलातील रस्त्यांची स्थिती, वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन कोअर क्षेत्रातील पर्यटन बंद ठेवण्यात येते. मात्र, ताडोबा बफर क्षेत्रातील पावसाळी पर्यटन सुरूच राहणार आहे. वन्यजीव संवर्धन आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पावसाळी हंगामात कोअर क्षेत्रातील सफारी पर्यटन ३० जून ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय ताडोबा प्रकल्प प्रशासनाने घेतला आहे.

बफर पर्यटन सुरू राहणार

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात, ३० जून हा मंगळवार असून कोअर क्षेत्रातील पर्यटनासाठी तो नियमित साप्ताहिक बंदीचा दिवस आहे. त्यामुळे याच दिवसापासून पावसाळी हंगामातील बंदी लागू होणार आहे. दरम्यान, या कालावधीत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सर्व बफर पर्यटन प्रवेशद्वारे आणि बफर क्षेत्रातील सफारी पर्यटन सुरू राहणार आहे. मात्र, हवामानाची परिस्थिती आणि प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या निर्देशांनुसार सफारीचे नियोजन करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पावसाळ्यातही वन्यजीव पर्यटनाचा आनंद घेण्याची संधी

बफर क्षेत्रातील सफारीसाठी ऑनलाइन आरक्षणाची सुविधा पूर्ववत सुरू राहणार असून पर्यटकांना अधिकृत ‘माय ताडोबा पोर्टल’वरून बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यातही वन्यजीव पर्यटनाचा आनंद घेण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध राहणार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक डॉ. प्रभू नाथ शुक्ला यांनी पर्यटकांना आपल्या भेटीचे नियोजन त्यानुसार करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सफारीसंदर्भातील अद्ययावत माहिती आणि प्रशासनाच्या सूचनांवर लक्ष ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

वन्यजीव संरक्षण व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी निर्णय

दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात जंगलातील रस्त्यांची स्थिती, वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन कोअर क्षेत्रातील पर्यटन बंद ठेवण्यात येते. यामुळे जंगलातील नैसर्गिक परिसंस्थेला आवश्यक विश्रांती मिळण्यासही मदत होते.

ताडोबा सफारी बुकिंग संकेतस्थळ हॅक झाल्याची पोस्ट खोटी; पोलिसांत तक्रार

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाइन सफारी बुकिंग संकेतस्थळाबाबत यूट्यूब आणि इतर समाज माध्यमांवर ताडोबा सफारी बुकिंग संकेतस्थळ हॅक झाल्याची बदनामीकारण पोस्ट सार्वत्रिक करण्यात आली. ताडोबाच्या बदनामीसाठीच काही समाजकंटकांनी हा प्रकार सुरू केला आहे. ताडोबा संकेतस्थळ हॅक झालेले नाही. अशी बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध पोलीस तक्रार करण्यात आली आहे. तेव्हा अशा समाजकंटकांपासून सावध राहावे, असा इशारा ताडोबा व्यवस्थापनाने दिला आहे.