नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील व्यवस्थापन कोट्यातील सफारीबाबत ताडोबा व्यवस्थापनाने नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आता व्हॉट्सॲप संदेश किंवा भ्रमणध्वनी संदेशावर सफारी नोंदणी केली जाणार नाही. तर व्यवस्थापन कोट्यातून सफारी पाहीजे असल्यास मान्यवरांच्या पत्रलेखन कागदावरच सफारीची विनंती असणे आवश्यक आहे.
व्यवस्थापन कोट्यातून सफारी आवश्यक असल्यास व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, कार्यालयीन वेळेनंतर उशिराने सफारीची मागणी करणे, विशिष्ट प्रवेशद्वारासाठी आग्रह करणे, अर्ज केल्याबरोबर लगेच सफारी मंजूर करण्याचा आग्रह धरणे असे प्रकार होत होते. यामुळे ताडोबा व्यवस्थापनाला अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. मात्र, पर्यटन व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीने राबवण्यासाठी तसेच कोणत्याही प्रकारच्या गोंधळामुळे वन्यजीवांना अथवा त्यांच्या अधिवासाला हानी होणार नाही याकरिता मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे व्यवस्थापन कोट्यातून सफारीची मागणी आल्यास मान्यवरांच्या अधिकृत पत्रलेखन कागदावरच ती असावी.
व्हॉट्सअप किंवा भ्रमणध्वनी संदेशाचा विचार करण्यात येणार नाही. प्रत्यक्ष सफारीच्या आदल्या दिवशी दूपारी तीन वाजेपर्यंत कार्यालयात प्राप्त झालेल्या विनंती, अर्जाचाच विचार करण्यात येईल. दूपारी तीन वाजेनंतर होणाऱ्या कोणत्याही अर्ज, विनंतीचा विचार करण्यात येणार नाही. व्यवस्थापन कोट्याअंतर्गत् सफारीची परवानगी सफारीच्या दिवशीच देता येणार नाही. उपलब्ध कोट्यानुसारच निवडक पत्र, अर्ज स्वीकारुन सफारीच्या आधीच्या दिवशी माहिती देण्यात येईल.
व्यवस्थापन कोट्यातील सफारी शुल्क ज्या प्रवेशद्वारावरुन सफारी आहे, त्याच प्रवेशद्वारावर सफारी सुरू होण्याच्या वेळेवर करण्यात यावे. हे शुल्क शक्यतो ऑनलाईन पद्धतीने करावे आणि शुल्काची पावती देण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत अग्रीम शुल्क अथवा सफारी झाल्यानंतर उशिराने शुल्क स्विकारले जाणार नाहीत. व्यवस्थापन कोट्यातील सफारीचे अर्ज मंत्री, खासदार, आमदार कार्यालयातील अधिकृत पत्रलेखन कागदावरच असणे आवश्यक आहे. एका अर्जावर गाभा क्षेत्रात एकाच वाहनाला परवानगी राहील. समूहाला परवानगी देता येणार नाही.
व्यवस्थापन कोट्यात पूर्ण दिवसाची सफारी देता येणार नाही. व्यावसायिक व्यक्ती, एजंट, पर्यटक ऑपरेटर्स, रिसॉर्ट मालक यांना व्यवस्थापन कोट्यातुन सफारी देता येणार नाही. व्यवस्थापन कोट्यातील सफारीची विनंती ही व्यवस्थापन कोटा ९५८८४०४३९९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा ‘infotadoba@gmail.com’ या ईमेलवर करण्यात यावी, असे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तथा वनसंरक्षक डॉ. प्रभूनाथ शुक्ल यांनी कळवले आहे.
