आग नियंत्रणात आणण्यात आलेल्या अपयशाने ‘तेलिया’ भक्ष्यस्थानी

वनवणव्यांवर नियंत्रण आणण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा चंद्रपूरच्या वनअकादमीत उभारली जावी आणि येथील नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्र हे देशातील नव्हे तर आशियातील सर्वोत्तम केंद्र ठरावे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन दिवसांपूर्वी ठासून सांगितले. मात्र, जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या वाघांचे अधिकारक्षेत्र असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील आगीवर त्यांच्या अधिकाऱ्यांना नियंत्रण मिळवता आले नाही. याउलट पर्यटकांसाठी हे क्षेत्र बंद करण्याचा प्रकार घडला. त्यामुळे वनमंत्र्यांनी अत्याधुनिक यंत्रणा तर उभारावीच, पण त्याआधी असलेली यंत्रणा तरी सुरळीत चालवण्याची तंबी संबंधित अधिकाऱ्यांना कां देऊ नये, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

काही महिन्यांपूर्वी आलेल्या केंद्राच्या अहवालात गेल्या दोन वर्षांत वणव्यांचे प्रमाण ५२ टक्क्यांनी वाढल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तरीही वणवा नियंत्रणासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी ज्या जाळरेषा तयार कराव्या लागतात, त्यांची कामेदेखील पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळेच यंदा मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. मोहर्ली वनक्षेत्रात सीतारामपेठकडून आठ दिवसांपूर्वी आग लागली आणि जगभरासमोर ज्या वाघीण आणि तिच्या बच्च्यांची प्रसिद्धी झाली, त्यांचे अधिवासक्षेत्र तेलिया आगीत भस्मसात झाले. याच क्षेत्रावर आणि त्यातील वाघांवर तयार झालेली लघुचित्रफित जगभरात प्रसिद्ध      झाली. मोहर्लीकडून ताडोबाकडे जाणारा रस्ता ओलांडून आग तेलियाकडे पोहोचली. आग पसरण्यामागे वादळ हे कारण प्रशासन देत आहे. सीतारामपेठेकडून आग आल्याचे प्रशासन मान्य करत आहे, तरीही मनुष्यनिर्मित आगीसंदर्भात कुणावरही जबाबदारी निश्चित केली नाही. आग मोठी होती म्हणूनच ती पसरली आणि अशावेळी या आगीची साधी चौकशीही होऊ नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

* यासंदर्भात ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक गणपती गरड यांना विचारले असता त्यांनी आग मनुष्यनिर्मित असावी याला दुजोरा दिला. वादळामुळे आगीने मोठे स्वरूप धारण केले होते. मात्र, यासंदर्भात अजूनपर्यंत ठोस काही हाती आले नसल्याने कुणावरही जबाबदारी निश्चित केलेली नाही. त्या परिसरात सध्या गवत पूर्णपणे जळाले, परिणामी तृणभक्षी प्राणी नाही. अशावेळी त्या क्षेत्रातील वाघांचा पर्यटकांवर हल्ला होऊ शकतो, हे लक्षात घेऊनच खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटन तात्पुरते बंद केल्याचे ते म्हणाले.

* श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कामे सुरू असतानाही आग लागत असेल तर मोठी बाब आहे. आता तर प्रशासनानेसुद्धा गावकऱ्यांना जाब विचारणे सुरू केले पाहिजे. कारण आग लागू नये ही गावकऱ्यांचीसुद्धा जबाबदारी आहे आणि ही आग सीतारामपेठेकडून आल्याचे स्पष्ट झाले आहे, असे ज्येष्ठ वन्यजीवतज्ज्ञ किशोर रिठे म्हणाले.