चंद्रपूर : राज्यातील प्रमुख वनपर्यटन स्थळ असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारीसाठीचे ऑनलाइन आरक्षण संकेतस्थळ सलग चार दिवसांपासून ठप्प असल्याने पर्यटकांसह पर्यटनाशी संबंधित संपूर्ण व्यवसाय साखळी अडचणीत आली आहे. ऑनलाइन बुकिंग होत नसल्याने देश-विदेशातील पर्यटकांना आरक्षण करता येत नसून, त्याचा थेट फटका हॉटेल व्यावसायिक, गाईड, जिप्सी चालक, होमस्टे चालक आणि स्थानिक पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांना बसत आहे. दरम्यान पावसाळ्यात ताडोबा कोर क्षेत्र बंद असून बफर सफारी सुरू आहे
प्रथमच तीन ते चार दिवसापासून संकेतस्थळ बंद
ताडोबाच्या इतिहासात तांत्रिक बिघाडामुळे सफारी बुकिंगचे संकेतस्थळ सलग तीन-चार दिवस बंद राहण्याची ही पहिलीच घटना असल्याचे पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे. यामुळे पर्यटकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अनेकांचे नियोजित दौरेही विस्कळीत झाले आहेत.
पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीनुसार, ऑनलाइन बुकिंग बंद असताना संबंधित कोटा स्पॉट बुकिंगसाठी उपलब्ध करून दिला जात नसल्याने रिक्त जागांचा उपयोगही होत नाही. परिणामी, पर्यटकांना सफारीची संधी मिळत नाही आणि ताडोबा प्रशासनालाही महसुलाचे नुकसान सहन करावे लागत आहे.
पर्यटन व्यवसायावर परिणाम
आधीच पर्यटन व्यवसायातील चढ-उतारांचा सामना करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांसाठी ही परिस्थिती अधिकच चिंताजनक ठरत आहे. पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांच्या उत्पन्नावर याचा परिणाम होत असून, बुकिंग बंद राहिल्याने आर्थिक अडचणी वाढत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. दरम्यान, या समस्येबाबत ताडोबा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याची खंत हितधारकांनी व्यक्त केली आहे. काहींनी प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसादही मिळत नसल्याचा आरोप केला आहे.
बीएसएनएलचा सर्व्हर डाऊन असल्याने संकेतस्थळ बंद
यासंदर्भात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला यांनी सांगितले की, “ताडोबा प्रशासनाकडून कोणतीही तांत्रिक अडचण नाही. बीएसएनएलचा सर्व्हर डाऊन असल्याने संकेतस्थळ कार्यरत नाही. संपूर्ण आरक्षण प्रणाली ऑनलाइन पद्धतीवर आधारित असल्यामुळे ऑनलाइन कोटा स्पॉट बुकिंगमध्ये रूपांतरित करणे शक्य नाही.”
सध्या ही समस्या लवकरात लवकर दूर करून ऑनलाइन आरक्षण सेवा पूर्ववत करण्याची मागणी पर्यटन व्यावसायिकांकडून होत आहे. कारण ताडोबाचा पर्यटन हंगाम सुरू असताना आरक्षण यंत्रणा ठप्प राहिल्यास त्याचा फटका केवळ पर्यटकांनाच नव्हे, तर संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
