Tadoba Safari Timings Change: नागपूर : तापमानाचा पारा यंदा चांगलाच टोकाला गेलाय आणि मे महिन्यात तो आणखी वर जाणार. याही परिस्थितीत सफारी तर करायचीच आहे. मग काय पर्यटकांच्या सुविधेसाठी, त्यांच्या व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा प्रशासनानेही वेळात बदल करायचा ठरावलाय.
फेब्रुवारीत बदललेल्या वेळा
फेब्रुवारी सुरू होताच राज्यात वाढत्या उन्हाचे चटके लागण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात दुपारच्या सफारीच्या वेळा बदलण्याचा निर्णय ताडोबा व्यवस्थापनाने घेतला. १३ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंतदुपारची सफारीची वेळ नेहमीप्रमाणे २ ते ६ अशी न राहता ती दुपारी २:३० ते ६:३० अशी करण्यात आली.
१३ फेब्रुवारी ते ३१ मार्चदरम्यान पूर्ण वेळ सफारीची वेळ सकाळी ६:१५ ते सायंकाळी ६:१५ अशी करण्यात आली. सकाळच्या सफारीची वेळ सकाळी ६:३० ते सकाळी १०:३० आणि दुपारच्या सफारीची वेळ दुपारी २:३० ते सायंकाळी ६:३० अशी करण्यात आली.
उन्हाचा चटका वाढताच एप्रिलमध्ये बदल
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पूर्णवेळ सफारी आता सकाळी ५.४५ ते सायंकाळी ७.१५ वाजेपर्यंत अशी असणार आहे. सकाळची सफारी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत असणार आहे. दुपारची सफारी दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असणार आहे. उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे यंदा दोन महिन्यांच्या कालावधीतच दोन वेळा ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात सफारीच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
सफारीच्या वेळेत बदल का
दरवर्षी १ मे पासून ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात सफारीच्या वेळात बदल केला जातो. मात्र, यंदा तापमानाचा पारा चांगलाच वाढणार अशी चिन्हे आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचे चटके बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हिवाळ्यात जशी किमान तापमानात घट होऊन थंडीची लाट आली होती, तशीच यावेळी उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प व्यवस्थापनाने आधीच सफारीच्या वेळांमध्ये बदल केला आहे.
१ मे ते ३० जून पर्यंत या वेळात सफारी
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात उन्हाळ्यात वाघ व अन्य वन्यजीव नैसर्गिक किंवा कृत्रिम पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे व्याघ्र दर्शनाची संधी अधिक असते. मात्र तीव्र उन्हामुळे पर्यटकांना त्रास होऊ नये, यासाठी ही वेळ पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या एक मे पासून तर ३० जूनपर्यंत पूर्णवेळ सफारी सकाळी ५.१५ ते सायंकाळी ७.१५ यावेळेत राहील. सकाळची सफारी सकाळी ५.३० ते सकाळी ९.३० अशी राहील. दुपारची सफारी दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत राहील.
बदलत्या वेळेचा काय परिणाम
ताडोबामधील स्थानिक मार्गदर्शक, ड्रायव्हर, छायाचित्रकार आणि पर्यटन व्यावसायिकांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. उन्हाळ्यात पर्यटनाची मागणी वाढते. आणि यावेळी यंदा खूप लवकर उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. पर्यटकांनाही याचा त्रास होतोय. वेळ पुढे ढकलल्यामुळे आता थोडा दिलासा मिळेल, असे एक मार्गदर्शक, वाहनचालक, पर्यटन व्यावसायिक, छायाचित्रकार म्हणाले.
