चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (टीएटीआर) विविध वनक्षेत्रांतील शाकाहारी प्राण्यांच्या असमतोल वितरणावर उपाय म्हणून वन विभागाने ‘सक्रिय पर्यावरणीय व्यवस्थापन’ (Active Ecological Management) अंतर्गत चितळांच्या (स्पॉटेड डिअर) अंतर्गत स्थानांतर मोहिमेला यशस्वी सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत न होता ३० चितळांचे सुरक्षित स्थानांतर करण्यात आले असून, या उपक्रमामुळे कोळसा वनपरिक्षेत्रातील भक्ष्यसाखळी अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
८० चितळ्यांच्या स्थानांतरणास मंजुरी
राज्य शासनाने वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ च्या कलम १२ अंतर्गत ८० चितळांच्या स्थानांतरास मंजुरी दिली आहे. त्यानुसार कोलारा वनपरिक्षेत्रातील जामणी गवताळ क्षेत्रातून कोळसा वनपरिक्षेत्रातील कोळसा गवताळ भागात टप्प्याटप्प्याने चितळांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात १६ चितळांचे स्थलांतर
पहिल्या टप्प्यात ३० जून रोजी ९ माद्या व ७ नर अशा १६ चितळांचे, तर १ जुलै रोजी ११ माद्या व ३ नर अशा १४ चितळांचे यशस्वी स्थलांतर करण्यात आले. संपूर्ण मोहिमेदरम्यान कोणत्याही प्राण्याला इजा झाली नाही किंवा जीवितहानी झाली नाही, ही या मोहिमेची सर्वात मोठी जमेची बाजू ठरली.
चितळ स्थलांतर बोमा तंत्रज्ञानाचा उपयोग
या मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रभावी मानल्या जाणाऱ्या ‘बोमा तंत्रज्ञानाचा’ वापर करण्यात आला. जामणी गवताळ क्षेत्रात उभारलेल्या विशेष ‘बोमा’ संरचनेत चितळांना सुरक्षितरीत्या आणल्यानंतर त्यांना थेट विशेष तयार केलेल्या स्थलांतर वाहनांमध्ये सोडण्यात आले. या वाहनांच्या आतील रचनेमुळे प्राण्यांवरील ताण कमी राहील, याची विशेष काळजी घेण्यात आली. तसेच नर व मादी चितळांचे स्वतंत्र नियोजन करून संतुलित प्रमाण राखण्यात आले.
ही संपूर्ण मोहीम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपसंचालक (कोअर) आनंद रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सहाय्यक वनसंरक्षक विवेक नातू, अनिरुद्ध ढगे, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल वैद्य, रुंदन काटकर तसेच वन विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.
यापूर्वी १०७ चितळचे स्थलांतर
यापूर्वीही जामणी गवताळ क्षेत्रातून १०७ चितळांचे यशस्वी स्थलांतर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात करण्यात आले होते. त्याच अनुभवाच्या आधारे ही मोहीम राबविण्यात आली आहे. पुढील टप्प्यांत आणखी ५० चितळांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली.
क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांनी सांगितले की, “या उपक्रमामुळे ताडोबाच्या कोअर क्षेत्राची वहनक्षमता वाढेल. वाघांसाठी आवश्यक भक्ष्य उपलब्ध झाल्याने त्यांचे बफर भागाकडे स्थलांतर कमी होईल आणि परिणामी मानव–वन्यप्राणी संघर्ष आटोक्यात आणण्यास मदत होईल.”
उपसंचालक आनंद रेड्डी यांनी सांगितले की, “बाह्य संस्थांची मदत न घेता ताडोबाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी अत्यंत तांत्रिक आणि संवेदनशील मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ही वन विभागाच्या वाढत्या कौशल्याची आणि आत्मविश्वासाची साक्ष आहे.”वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही मोहीम केवळ चितळांचे स्थलांतर नसून, ताडोबातील परिसंस्थेचा समतोल राखण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. शाकाहारी प्राण्यांची संख्या संतुलित झाल्यास वाघांसह इतर मांसाहारी वन्यजीवांसाठी पुरेसा भक्ष्यसाठा उपलब्ध होईल आणि दीर्घकालीन वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत मिळेल.
