नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि तिथल्या प्रत्येक वाघाच्या कथा वेगवेगळ्या. “कॉलरवाली” या नावाने ओळखली जाणारी वाघीण अशीच. अलीकडेच तिचा “रोड शो” औत्सुक्याचा विषय ठरला आहे. वन्यजीव छायाचित्रकार कंचन पेठकर यांनी हा “रोड शो” कॅमेऱ्यात चित्रित केला.
वाघिणीचा “swag”
“रोड शो” फक्त राजकारणातील नेते मंडळींनाच करता येतो का ? जनता फक्त या नेत्यांच्या “रोड शो” मध्ये सहभागी होते का ? “रोड शो” आम्हालाही करता येतो. ताडोबातील “कॉलरवाली” ला कदाचित हेच सांगायचे असेल आणि उन्हाळ्याच्या सकाळी या वाघिणीने तिच्या मोठ्या झालेल्या बचड्यांसह “रोड शो” केला आणि तो यशस्वी देखील झाला. “कॉलरवाली” समोर आणि मागे तिचे बछडे तिच्या पावलावर पाऊल टाकत होते.
तिच्या शौर्याच्या कथा अमाप
“कॉलरवाली” वाघीण तिचे बछडे लहान होते तेव्हाही बिनधास्तपणे त्यांना रस्त्यावर घेउन फिरत होती. आणि आता ते मोठे झाल्यानंतर त्यांच्यासोबत चक्क ती “रोड शो” करत आहे. तिच्या बछड्यांचे रक्षण करण्यासाठी ती तेवढीच सक्षम आहे हेच जणू तिला दाखवून द्यायचे आहे. तिच्या बछड्यांसाठी सुरक्षित अधिवास शोधतांना ती कित्येकदा इतर वाघांसोबत भिडली आहे. गेल्या वर्षीच बुद्ध पौर्णिमेच्या रात्री ताडोबाच्या गाभा क्षेत्रात तेलीया तलाव परिसरात ती “सोनम” या वाघिणीशी भिडली आणि तिला जखमी केले.
मध्यप्रदेशातील “कॉलरवाली” वेगळी
मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पात देखील एक वाघीण “कॉलरवाली” म्हणून ओळखली जाते होती. भारतातील ही एकमेव वाघीण होती जिने तिच्या संपूर्ण आयुष्यात २९ बछड्याना जन्म दिला. त्यामुळेच तिला “सुपरमॉम” म्हणून सुद्धा ओळखले जात होते. वाघ साधारणपणे १४ ते १५ वर्षाचे आयुष्य जगतो, पण मध्यप्रदेशातील ही “सुपरमॉम” तब्बल १७ वर्षे जगली. अलीकडेच तिचे निधन झाले. तिचा वारसा महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील “कॉलरवाली” चालवत आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.
ही “कॉलरवाली” मात्र महाराष्ट्रातील
ताडोबातील “लारा” आणि “वाघडोह” या वाघीण आणि वाघाची ती मुलगी असल्याचे सांगितले जाते. आता ती देखील मातृत्वाचा अनुभव घेत आहे. तिने जेव्हाही बछड्याना जन्म दिला तेंव्हा तेव्हा तिने बच्चड्यांसहित पर्यटकांसमोर येऊन पर्यटकांना खुश केले. ही “कॉलरवाली” वाघीण आणि तिच्या बछड्यांनी आताही पर्यटकांना असेच वेड लावले आहे. यापूर्वी तिने तीन बचड्यांना जन्म दिला होता. तेव्हाही ती तिच्या बचड्यांसह बिनधास्तपणे जंगलातील पर्यटनाच्या रस्त्यावर यायची.
