नागपूर : केसलाघाटच्या जंगलात सकाळचा धुसर उजेड पसरलेला… पर्यटकांची गाडी सावधपणे पुढे सरकत असतानाच झुडपांआड हलकीशी हालचाल जाणवते… आणि पुढच्याच क्षणी समोर येते—ती… ‘के मार्क’!
आज तिचं रूपंच वेगळे..
काही महिन्यांपूर्वी याच वाघिणीचं नाव घेतलं तरी पर्यटकांच्या अंगावर काटा यायचा. वाहन दिसलं की थेट झडप घालणारी, आक्रमकतेचं जणू प्रतीक बनलेली ‘के मार्क’… पण आज तिचं रूप वेगळंच आहे. आज ती आई आहे—आणि तिच्या बछड्यांसोबत मायेचे, कोमल क्षण अनुभवताना दिसते. हा हृदयस्पर्शी क्षण वन्यजीव छायाचित्रकार अभिषेक सिंग यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
ताडोबात बछड्यांची गर्दी..
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात सध्या बछड्यांची चांगलीच लगबग आहे. अनेक वाघीण मातृत्वाचा अनुभव घेत आहेत. चार-चार बछड्यांना जन्म देणाऱ्या वाघिणीही येथे दिसत आहेत. त्यामुळे जंगलातले दृश्य केवळ थरारकच नाही, तर भावनिकही झाले आहे. ‘के मार्क’सुद्धा याच मातृत्वाच्या प्रवासात रमलेली दिसते. पण तिच्या या मायेच्या मागे एक वेदनादायक कथा दडलेली आहे…
काही महिन्यांपूर्वी काय घडले..
काही महिन्यांपूर्वी केसलाघाट परिसरात ‘के मार्क’ वाहनांवर हल्ला करत असल्याच्या घटना घडल्या. एका हल्ल्यात एकजण जखमीही झाला. त्या वेळी तिची ही आक्रमकता का वाढली, याबाबत अनेक चर्चा रंगल्या. कारण स्पष्ट होतं—तिच्या एका बछड्याचा मृत्यू. केसलाघाट मार्गावर वाहनाच्या धडकेत तिच्या एका बछड्याचा जीव गेला. रात्रीच अपघात झाला आणि ताबडतोब त्या बछड्याला तेथून हटवण्यात आलं. दुसऱ्याच दिवशी शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कारही पार पडले. वनखात्याकडून अधिकृत माहिती न मिळाली तरी, या घटनेनंतर ‘के मार्क’ची आक्रमकता वाढल्याचं अनेकांनी अनुभवलं. आईच्या वेदनेतून जन्माला आलेला तो संताप… आणि आज त्याच आईच्या डोळ्यांत दिसणारी माया—हा बदल केवळ थक्क करणारा आहे.
ती सुरुवातीपासूनच धाडसी..
‘के मार्क’ ही साधी वाघीण नाही. ताडोबातील प्रसिद्ध ‘माधुरी’ वाघीण आणि ‘खली’ वाघ यांची ती पिल्लू. केसलाघाटच्या डोंगररांगांमध्ये तिचं राज्य आहे. धाडस, सौंदर्य आणि आक्रमकता—या सगळ्यांचा संगम असलेली ‘के मार्क’ आजही दक्षिण ताडोबाच्या जंगलावर आपली हुकूमत गाजवते. तिचा अधिवास मात्र तितकाच धोकादायक. राष्ट्रीय महामार्ग तिच्या क्षेत्रातून जातो. अनेकदा ती हा महामार्ग ओलांडताना दिसते, तर कधी लांबवर त्याच रस्त्यावरून फिरताना. तिच्या परिसरात ‘छोटा मोगली’ आणि ‘झरणी’सारखे इतर वाघही अधूनमधून येतात, पण ‘के मार्क’च्या हद्दीत शेवटचा शब्द तिचाच असतो. एकेकाळी भीतीचं प्रतीक असलेली ही वाघीण आज मातृत्वाच्या मायेने ओथंबलेली दिसते… आणि केसलाघाटच्या जंगलात पुन्हा एकदा निसर्गाचा तोच नियम अधोरेखित होतो— जंगलात शक्तीइतकीच माया देखील तितकीच प्रभावी असते.
