नागपूर : चंद्रपूर जिल्हा म्हणजे वाघांची खाण, पण या खाणीतून निघणाऱ्या वाघांनाही खासगी आयुष्य असते याचा विसर वनविभागाला पडला. जळीस्थळी व्याघ्रपर्यटन सुरू झाल्याने वाघांचा अक्षरशः बाजार मांडल्यासारखी स्थिती निर्माण झाली. कारवा वनक्षेत्रात वाघाला बघण्यासाठी अक्षरशः पर्यटकांची झुंबड उडाली.

अतिपर्यटनाचा वाघांवर येतोय ताण..

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प जागतिक व्याघ्रपर्यटनाच्या नकाशावर अग्रस्थानी आहे. सहज होणाऱ्या व्याघ्रदर्शनासाठी देशविदेशातून पर्यटक येतात आणि इथले वाघही त्यांना निराश करत नाही. मात्र, हे अतिपर्यटन आता वाघांच्या जीवावर बेतू लागले आहे. अलीकडेच वाघांचे बेकायदेशीर चित्रण करणाऱ्या बंगळुरू स्थित छायाचित्रकाराला तिन दिवस चौकशीत ठेवण्यात आले. याच व्याघ्रप्रकल्पातील अनेक वाघ गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. ताडोबासह देशातील पाच व्याघ्रप्रकल्पाच्या झालेल्या अभ्यासात वाघांवर स्ट्रेस आल्याचे समोर आले.

कारवा सफारीत काय घडले

पाच वर्षांपूर्वी सुरु झालेल्या कारवा सफारीत ‘एरिना’ ही वाघीण तिच्या बछड्यासह उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी पाणवठ्यात उतरले. मात्र, येथेही पर्यटकांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. आई आणि बछडा शांतपणे अंगाचा दाह शांत करत असताना पर्यटकांची वाहने त्याठिकाणी येऊन धडकली. एक, दोन, तीन नाही तर असंख्य वाहनांचा ताफा त्याठिकाणी पोहचला. त्यांनी अक्षरशः पणवठ्याच्या सभोवताली वाहने लावली आणि त्या आई व बछड्यांची फोटोग्राफी करण्यासाठी कॅमेऱ्यांच्या बटनांचे आवाज सुरू झाले. हे कमी होते म्हणून की काय पर्यटकांनी अक्षरशः त्याठिकाणी गोंधळ घातला. त्या आई आणि बछड्यांचा खासगी क्षण पर्यटकांनी सार्वजनिक केला.

ताडोबा सफारीला पर्याय, पण..

कारवा सफारीचे प्रवेशद्वार हे नागपुरपासून १७० किलोमीटर आहे. चंद्रपूरहून जुनोनामार्गे हे अंतर १९ किलोमीटर, तर बल्लारपूरपासून हे अंतर अवघे सहा किलोमीटर आहे. प्रतिव्यक्ती अवघे ५०० रुपये इतके शुल्क ठेवण्यात आले आहे. तर गाईडचे शुल्क हे ३५० रुपये आहे. दिवसातून दोनदा ही सफारी घडविली जाणार आहे. सकाळी ६ ते १० आणि दुपारी २ ते ६ अशी वेळ ठरविण्यात आली आहे. सध्या एका वेळी केवळ चार वाहने सोडण्यात येत आहे. मात्र, पर्यटकांचा प्रतिसाद बघता वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्हा हा जंगल आणि जैवविविधतेने नटला आहे. त्यामुळे केवळ ताडोबा नव्हे, तर इतर वनक्षेत्रातदेखील वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. सोबत बिबट, अस्वल, राणकुत्रे, रानगवा, हरण, चितळ, सांबर, रानमांजर यांचीदेखील संख्या मोठ्या प्रमाणात आहे.