चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील वाघ आता थेट रस्त्यावर येऊन शिकार करीत आहेत. चंद्रपूर-मूल महामार्गावरील जानाळा गावाजवळ रविवार, ५ एप्रिल रोजी दुपारी ११:३० वाजताच्या सुमारास ‘मामा’ वाघाने हल्ला करून एका गाईला ठार केले. गायीच्या शिकारीचा हा थरार या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेकांनी बघितला. महामंडळाची बस, तसेच अनेक चारचाकी व दुचाकी वाहनांची गर्दी या मार्गावर झाली होती.
‘मामा’ वाघाने भररस्त्यात गायीची शिकार केल्यानंतर चक्क महामार्गावरून जंगलाच्या दिशेने शिकार ओढत नेली. ही घटना वनपरिक्षेत्र चिचपल्ली बीट, जानाळा कक्ष क्रमांक ७१५ जवळ घडली. आगडी येथील शेतकरी राजेंद्र वाढई यांची गाय रस्त्यालगत चरत असताना वाघाने अचानक झडप घातली. या हल्ल्यात गाईचा जागीच मृत्यू झाला. ताडोबा वनपरिक्षेत्रातील हा ‘मामा’ वाघ परिसरातील सर्वात मोठा असल्याचे सांगितले जाते.
घटनेनंतर महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी वाघाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. त्यामुळे काही काळ वाहनांचा रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे शेतकरी राजेंद्र वाढई यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.
पाहा व्हिडीओ

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. रविवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास वाघाने गायीवर हल्ला करून तिची शिकार केल्याचा व्हिडीओ व फोटो समाज माध्यमावर सार्वत्रिक झाले आहे.
नागरिकांची वाढती गर्दी पाहता कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेश्कर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक निमकर व वनकर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त केला. विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. फोटो-व्हिडीओ काढण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे
