नागपूर : पावसाळ्यातील हिरवाई, चिखल आणि धुक्याची चादर दूर होत ऑक्टोबरमध्ये जंगलांचे रूप पुन्हा बदलते. निळेशार आकाश, कोवळे ऊन आणि पावसानंतर बहरलेली वनराई पर्यटकांना खुणावू लागते. त्यातच अनेक व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्ये पावसाळी विश्रांतीनंतर पर्यटकांसाठी पुन्हा खुली होत असल्याने वन्यजीवप्रेमींची प्रतीक्षा संपते.
पावसाळ्यात मात्र निर्बंध
पावसाळ्यात वनक्षेत्रांमध्ये पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध असतात. या काळात वन्यजीवांना प्रजनन आणि अधिवासासाठी आवश्यक असलेली शांतता मिळते. मुसळधार पावसामुळे खराब झालेले रस्ते, सफारी मार्ग आणि अन्य सुविधा दुरुस्त करण्यासाठीही वन विभागाला वेळ मिळतो. त्यामुळे ऑक्टोबरपासून सुरू होणारा सफारी हंगाम हा केवळ पर्यटकांसाठीच नव्हे, तर जंगल व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरतो.
पावसानंतर जंगलाचे नवे रूप
पावसाळ्यानंतर जंगलात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. जलस्रोतांमध्ये पाण्याची उपलब्धता वाढलेली असते आणि अनेक भागांमध्ये वन्यजीवांच्या हालचालीही पाहायला मिळतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात किंवा सायंकाळच्या वेळी वन्यप्राण्यांचे दर्शन घेण्यासाठी हा काळ पर्यटकांच्या पसंतीचा मानला जातो. वाघ पाहण्यासाठी देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठीही ऑक्टोबरपासून सफारीचा नवा हंगाम सुरू होतो. मात्र, प्राणी दर्शनाची हमी नसते. जंगलातील प्राण्यांचे वर्तन, हवामान, पाण्याची उपलब्धता आणि त्यांची हालचाल यावर दर्शन अवलंबून असते.
कोणती उद्याने ऑक्टोबरमध्ये खुली होणार?
देशातील अनेक महत्त्वाची अभयारण्ये आणि व्याघ्रप्रकल्प पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये पर्यटकांसाठी खुले होतात. महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्रप्रकल्प, पेंच व्याघ्रप्रकल्पसह मध्यप्रदेशातील कान्हा, बांधवगड, पेंच आणि सतपुडा, राजस्थानातील रणथंभोर, तसेच कर्नाटकातील बांदीपूर आणि नागरहोल यांसारखी ठिकाणे वन्यजीवप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरतात. याशिवाय देशातील विविध राज्यांतील अभयारण्ये आणि व्याघ्रप्रकल्पांमध्ये ऑक्टोबरपासून सफारीचे वेळापत्रक आणि उपलब्ध मार्गांमध्ये बदल होऊ शकतो. काही ठिकाणी पावसाची स्थिती, रस्त्यांची अवस्था किंवा स्थानिक व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार काही भाग बंद ठेवले जाऊ शकतात.
सफारीपूर्वी नियमांची माहिती आवश्यक
पावसाळ्यानंतर जंगल खुले झाले म्हणून सर्व क्षेत्रांमध्ये एकाच वेळी प्रवेश मिळेलच असे नाही. कोअर आणि बफर क्षेत्रांचे नियम वेगवेगळे असू शकतात. सफारीची ऑनलाइन नोंदणी, वाहनांची संख्या, प्रवेशाच्या वेळा आणि मार्ग याबाबत संबंधित वन विभागाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ऑक्टोबरमध्ये जंगल सफारीला जाणाऱ्यांसाठी त्यामुळे हा काळ निसर्ग अनुभवण्याची उत्तम संधी असली, तरी वन्यजीवांच्या अधिवासाचा आदर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. अखेर जंगल पर्यटकांसाठी उघडते, ते जंगलातील प्राण्यांच्या किमतीवर नव्हे, तर त्यांच्या अधिवासाशी समन्वय साधूनच.
