चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाइन सफारी बुकिंग संकेतस्थळाबाबत यूट्यूब आणि इतर समाज माध्यमांवर ताडोबा सफारी बुकिंग संकेतस्थळ हॅक झाल्याची बदनामीकारण पोस्ट सार्वत्रिक करण्यात आली. ताडोबाच्या बदनामीसाठीच काही समाजकंटकांनी हा प्रकार सुरू केला आहे. ताडोबा संकेतस्थळ हॅक झालेले नाही. अशी बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यांविरूध्द पोलीस तक्रार करण्यात आली आहे. तेव्हा अशा समाजकंटकांपासून सावध राहावे असा इशारा ताडोबा व्यवस्थापनाने दिला आहे.

ताडोबा व्यवस्थापनाचे म्हणणे काय?

ताडोबा व्यवस्थापनाने हॅकिंगचे दावे निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी करण्यात आलेल्या तांत्रिक तपासणीत संकेतस्थळात कोणतीही सुरक्षा त्रुटी अथवा हॅकिंग झाल्याचे आढळून आले नसल्याची माहिती व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने दिली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनासाठी सफारी बुकिंगची सुविधा ऑनलाइन उपलब्ध असून ती ‘माय ताडोबा’ या संकेतस्थळाद्वारे दिली जाते. या प्रणालीचे व्यवस्थापन आणि संचालन राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राकडून (एनआयसी) केले जाते. प्रकल्पातील कोअर आणि बफर अशा दोन्ही पर्यटन क्षेत्रांसाठी ऑनलाइन तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.

नेमके प्रकरण काय?

२० मे २०२६ रोजी यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवर एक पोस्ट प्रसारित करण्यात आली होती. या पोस्टमध्ये ताडोबा सफारी बुकिंग संकेतस्थळ हॅक करण्यात आल्याचा तसेच ऑनलाइन उपलब्ध असलेल्या सुमारे ८० टक्के तिकिटांची बेकायदेशीर विक्री होत असल्याचा दावा करण्यात आला होता. या दाव्यांची गंभीर दखल घेत एनआयसीच्या तांत्रिक पथकाने संपूर्ण प्रणालीची तपासणी केली. तपासणीनंतर सादर करण्यात आलेल्या अहवालात संकेतस्थळाच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी आढळून आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या सायबर हल्ल्याचा किंवा अनधिकृत हस्तक्षेपाचा पुरावा मिळालेला नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

व्याघ्र प्रकल्पाची प्रतिमा मलिन करण्याचा उद्देश

ताडोबा व्यवस्थापनाच्या मते, संबंधित सोशल मीडिया पोस्ट ही दिशाभूल करणारी असून व्याघ्र प्रकल्पाची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने ती प्रसारित करण्यात आली असावी. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधितांविरोधात पोलिसांत औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संदर्भातील पुढील तपास आणि घडामोडींबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल, असे ताडोबा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक डॉ. प्रभूनाथ शुक्ला यांनी नागरिकांना अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून अधिकृत माहितीसाठी केवळ प्रकल्प प्रशासनाच्या अधिकृत माध्यमांवरच अवलंबून राहण्याचे सांगितले आहे.