नागपूर : आई म्हणजे ममता, त्याग आणि संरक्षण याचं मूर्तिमंत रूप… मग ती मानवाची असो किंवा जंगलातील प्राण्यांची. अशीच आईपणाची जिवंत अनुभूती देणारी घटना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प परिसरात कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका मादी अस्वलने आपल्या दोन पिल्लांना पाठीवर बसवून तब्बल २ ते ३ किलोमीटरचा प्रवास केल्याचे दुर्मिळ आणि भावनिक दृश्य वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकर यांनी टिपले आहे.

पिल्लांची काळजी आणि संरक्षणाची भावना

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मोहर्ली कोअर झोनच्या जुनी विहीर या मुख्य मार्गावर हा हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला. दाट जंगलातून सावधपणे मार्गक्रमण करताना मादी अस्वलीने आपल्या नाजूक शावकांना पाठीवर बसवून सुरक्षितपणे पुढे नेले. तिच्या प्रत्येक पावलात पिल्लांबद्दलची काळजी आणि संरक्षणाची भावना स्पष्ट दिसत होती.

हा प्रसंग केवळ जंगलातील एक साधा क्षण नव्हता, तर आईच्या मायेचा आणि संघर्षाचा जिवंत प्रत्यय देणारा होता. जंगलातील कठीण परिस्थितीतही आपल्या पिल्लांना सुरक्षित ठेवण्यासाठी आई अस्वली किती सजग असते, याचे प्रभावी उदाहरण या दृश्यातून पाहायला मिळाले.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प व्याघ्रदर्शनासाठी ओळखला जातो. या जंगलात येणाऱ्या पर्यटकांना वाघच बघायचा असतो. त्यामुळे इतर वन्यप्राण्यांकडे पर्यटकांचे लक्ष जातच नाही. मात्र, ताडोबाचे जंगल वाघापुरतेच मर्यादित नाही. तर ताडोबातील इतर प्राणीही तेवढेच महत्वाचे आहेत, हे दीप काठीकर यांच्या या व्हिडिओतून दिसून येते. आपल्या दोन्ही पिल्लांना पाठीवर घेऊन पाणवठ्यावर पाणी प्यायला गेले. त्यावेळी पिल्लं पाठीवरून उतरली. मग पुन्हा परतीच्या प्रवासात त्यांनी आईच्या पाठीवर उडी मारली आणि ते जंगलाच्या दिशेने रवाना झाले.

पाठीवर पिल्लं नेणं का खास?

भारतात आढळणारे Sloth Bear म्हणजेच भारतीय अस्वल (स्लॉथ बेअर) आपल्या पिल्लांना संरक्षणासाठी पाठीवर वाहून नेतात. विशेषतः पिल्ले लहान असताना किंवा चालताना थकत असतील, तेव्हा ती आईच्या पाठीवर घट्ट पकडून बसतात. शिकाऱ्यांपासून संरक्षण आणि सुरक्षित प्रवासासाठी ही त्यांची नैसर्गिक संरक्षण पद्धत मानली जाते. अशा प्रकारची दृश्ये दुर्मिळ मानली जातात. मात्र, विदर्भातील काही वनक्षेत्रांत अधूनमधून अशी उदाहरणे पाहायला मिळतात. पिल्ले काही महिने आईसोबत राहतात आणि मोठी होईपर्यंत आईच्या संरक्षणाखालीच वाढतात. दरम्यान, जंगलांचे क्षेत्र कमी होत असल्याने या अस्वलांचा नैसर्गिक अधिवासही कमी होत चालला आहे. त्यामुळे जंगलातील प्राणी आणि मानव यांच्यातील सहअस्तित्वाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.