नागपूर : तोंडात तागाचे गोणपाट पकडून खडकांवरून उड्या मारणारा आणि काही वेळाने तेच गोणपाट घेऊन पाण्यात खेळणारा वाघाचा बछडा… ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील हा व्हिडिओ पाहताना प्रथमदर्शनी तो केवळ गोंडस आणि मनोरंजक वाटतो. मात्र, या दृश्यामागे जंगलातील वाढता मानवी हस्तक्षेप आणि वन्यजीवांच्या अधिवासात पोहोचणाऱ्या कचऱ्याचे गंभीर वास्तवही दडलेले आहे.
व्हिडिओमध्ये नेमके काय?
वन्यजीव छायाचित्रकार जतीन पटेल यांनी चित्रित केलेल्या या व्हिडिओमध्ये ‘के मार्क’ वाघीण तिच्या दोन बछड्यांसह केसलाघाट परिसरातील नैसर्गिक जलकुंडाजवळ विसावलेली दिसते. त्याच वेळी एका बछड्याच्या नजरेस खडकांवर पडलेले तागाचे गोणपाट पडते. कुतूहलापोटी तो ते तोंडात उचलतो आणि काही क्षणांतच ते त्याच्यासाठी खेळण्याचे साधन बनते. गोणपाट तोंडात धरून तो एका खडकावरून दुसऱ्या खडकावर धावतो, उड्या मारतो आणि अखेरीस जलकुंडात जाऊन बसतो. काही वेळाने ते खेळणे किंवा खाद्यपदार्थ नसल्याचे लक्षात आल्यानंतर तो ते पाण्यात सोडून देतो. त्याची आई आणि दुसरा बछडा मात्र शांतपणे हा सगळा प्रकार पाहत असतात.
बछड्यांसाठी स्विमिंग पूल, पण…
ताडोबातील केसलाघाट परिसर दगडी कडे, नैसर्गिक जलकुंडे आणि उन्हाळ्यातही टिकून राहणाऱ्या पाणीसाठ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या जलकुंडांमध्ये खेळणाऱ्या ‘के मार्क’ वाघिणीच्या बछड्यांचे अनेक व्हिडिओ यापूर्वीही सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी बछड्यांनी जलकुंडाला जणू ‘स्विमिंग पूल’ बनवल्याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. मात्र, या नव्या व्हिडिओने एक वेगळाच प्रश्न पुढे आणला आहे. जंगलाच्या आत तागाचे गोणपाट पोहोचलेच कसे? आणि वन्यजीवांच्या संपर्कात येणाऱ्या अशा वस्तू भविष्यात किती धोकादायक ठरू शकतात?
वन्यजीव अभ्यासक म्हणतात…
वन्यजीव अभ्यासकांच्या मते, वाघांसह अनेक वन्यप्राणी कुतूहलापोटी अशा वस्तूंशी खेळतात. परंतु प्लास्टिक, दोऱ्या, गोणपाट, रंगाच्या बादल्या किंवा इतर कृत्रिम वस्तूंचा संपर्क त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. काही वेळा प्राणी अशा वस्तू गिळू शकतात, त्यात अडकू शकतात किंवा त्यांना दुखापत होऊ शकते. विशेष म्हणजे, अलीकडच्या काही वर्षांत देशातील विविध व्याघ्र अधिवासांमध्ये अशा घटना वारंवार समोर येत आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, बोर व्याघ्रप्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य तसेच राजस्थानातील रणथंबोरमध्येही वाघ प्लास्टिकच्या बाटल्या, झाडणी, रंगाच्या बादल्या किंवा इतर मानवनिर्मित वस्तूंशी खेळताना दिसले आहेत. पर्यटकांसाठी हे दृश्य आकर्षणाचे ठरत असले, तरी जंगलात मानवी कचरा किती खोलवर पोहोचला आहे, याची ती धोक्याची घंटा मानली जाते.
