नागपूर : ताडोबाच्या जंगलात असे काही क्षण येतात की ते वन्यजीव छायाचित्रणापूरते मर्यादित राहात नाही, तर वाघांचा एक इतिहास उभा करतात. मदनापूर परिसरात असाच एक दुर्मीळ आणि भावनिक क्षण वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकर यांनी टिपला. ताडोबातील प्रसिद्ध वाघीण आणि तिच्या बछड्यांनी इतिहासाची पुनरावृत्ती केली.

ताडोबातील आतापर्यंतचा संस्मरणीय क्षण

दीप काठीकर यांनी यापूर्वी देखील असे अदभूत क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मदनापूर बफर क्षेत्रात रविवारची सायंकाळ अशीच आठवणीत राहणारी ठरली. अतिशय भावनिक असा क्षण अनुभवायला मिळाला. ताडोबातील प्रसिद्ध वाघीण जुनाबाई तिच्या चार बछड्यांसह मार्गक्रमण करत असताना तिचा मार्ग एका मंदिराजवळून गेला. विशेष म्हणजे या वाघिणीचे नाव ज्या प्राचीन मंदिरावरून ठेवण्यात आले, त्याच मंदिरासमोर ती तिच्या पुढच्या पिढीसह जाऊन पोहोचल्याने हा प्रसंग इतिहासाची पुनरावृत्ती करणारा, जुनाबाईची परंपरा पुढे नेणारा आणि अधिकच संस्मरणीय ठरला.

दशकभराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले

जुनाबाईचे हे चारही बछडे बलाढ्य ‘झायलो’ या वाघाचे अपत्य आहेत. पारंपरिक मंदिरासमोर आई वाघीण आणि तिचे बछडे एकत्र दिसत असलेले हे दृश्य जणू एखाद्या पारंपरिक मिरवणुकीसारखे भासत होते. स्थानिक लोककथा, श्रद्धा आणि ताडोबाच्या समृद्ध वन्यजीवनाचा अनोखा संगमकॅमेऱ्यात अलगद टिपला गेला. हा क्षण टिपणार दीप काठीकर म्हणाला, जुनाबाई एक दिवस आपल्या बछड्यांना त्या मंदिराजवळ घेऊन येईल, अशी कल्पना मी दशकभरापासून मनात जपून ठेवली होती. आज ताडोबाच्या जंगलाने ते स्वप्न प्रत्यक्षात आणले.

‘जुनाबाई’ नावामागची कथा

या क्षणाचे महत्त्व आणखी एका कारणामुळे वाढते. चिमूर तालुक्यातील मदनापूर गावाजवळ जंगलात असलेल्या प्राचीन जुनाबाई मंदिरावरून या वाघिणीला ‘जुनाबाई’ हे नाव मिळाले. स्थानिक आख्यायिकेनुसार जुनाबाई, चिंदाबाई आणि सोनाबाई या तीन बहिणी जंगलात हरवल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ या भागात मूर्ती आणि मंदिरे उभारण्यात आली. याच मंदिर परिसरात जन्मलेल्या वाघिणीची ओळख पुढे ‘जुनाबाई’ म्हणून निर्माण झाली. ताडोबातील सर्वाधिक यशस्वी वाघिणींमध्ये गणल्या जाणाऱ्या जुनाबाईला वन्यजीवप्रेमी ‘सुपरमॉम’ म्हणूनही ओळखतात. अनेक संकटांवर मात करत तिने आतापर्यंत २३ पेक्षा अधिक बछड्यांना जन्म दिला असून त्यांचे संगोपन केले.

भावनिक आणि ऐतिहासिक परिमाण

ज्या मंदिराने तिला नाव दिले, त्याच मंदिरासमोर आता तिची पुढची पिढी उभी राहिल्याचे चित्र कॅमेऱ्यात बंदिस्त झाले. ताडोबाच्या जंगलात निसर्गाने लिहिलेल्या या कथेला त्यामुळे एक वेगळेच भावनिक आणि ऐतिहासिक परिमाण लाभले आहे. ताडोबातील वाघांच्या अनेक छायाचित्रांनी जगभरातील पर्यटकांना आकर्षित केले आहे. मात्र, दीप काठीकर यांनी टिपलेला हा क्षण निसर्ग स्वतःच्या शैलीत कविता लिहित असल्याची जाणीव करून देणारा आहे.