नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘जुनाबाई’ आता वृद्धत्वाकडे झुकत आहे. मात्र, त्याचवेळी ‘जुनाबाई’चे मातृत्व सर्वांसाठीच आश्चर्याचा सुखद धक्का देणारे ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी आई झालेल्या ‘जुनाबाई’ चा बछड्यांसह नैसर्गिक पाणवठ्यातील आनंदाचा क्षण वन्यजीव छायाचित्रकार जतीन पटेल यांनी टिपला आहे.

उन्हाची काहिली आणि पाणवठ्याचा आधार

अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आणि तो परतही गेला. मात्र, कमाल तापमानाचा पारा आता वेगाने वाढत आहे. माणसांसाठी कुलर, एसी यासारखे पर्याय उपलब्ध असताना जंगलातील प्राण्यांसाठी पाणवठे हेच त्यांचे उन्हाची काहिली, शरीराचा दाह कमी करण्याचे एक साधण आहे. त्यामुळे पर्यटकांनाही बरेचदा उन्हाळ्यात वाघ पाणवठ्याजवळच दिसतात. जुनाबाईं आणि तिच्या बछड्यांनी सुद्धा तेच केले.

महाराष्ट्रातील सुपरमॉम

एक ‘सुपरमॉम’ मध्यप्रदेशात होती तर दुसरी ‘सुपरमॉम’ जुनाबाई ही महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आहे. या व्याघ्रप्रकल्पातील मदनापूर बफर क्षेत्रात तीने आपले साम्राज्य निर्माण केले आहे. या साम्राज्यात तिने आतापर्यंत २३ बछड्यांना जन्म दिला आहे आणि त्यांचे सुरक्षित पालनपोषण केले आहे. म्हणूनच ती आता ‘सुपरमॉम’ सोबत ‘सुपर आजी’ देखील ठरली आहे. तिच्या साम्राज्यालगत म्हणजेच मदनापूर बफरलगत बेलारा बफर क्षेत्रात आपले साम्राज्य निर्माण केले आहे.

शक्ती आणि जगण्याच्या जिद्दीचे प्रतीक

‘जुनाबाई’ने २०१८ पासून तर आतापर्यंत तिने २३ बछड्यांना जन्म दिला आहे. एवढेच नाही तर त्यांचे यशस्वी संगोपन केले आहे. दाट बांबूची जंगले आणि एकांत पायवाटा यांचा कुशल वापर करून तिने आपल्या पिल्लांना ‘ताला’ आणि ‘मटकासूर’ या ताडोबातील इतर वाघांच्या यांसारख्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवले. मात्र, काही बछड्यांना तिने गमावले देखील आहे. मात्र, तिची मातृत्वाची तीव्र भावना आणि योजनाबद्ध हालचाल यामुळे तिला ताडोबातील सर्वात जिद्दी व सक्षम वाघिणींमध्ये गणले जाते.

तिला सुरक्षित अधिवास हवा

मात्र दिवसेंदिवस पिल्लांना सुरक्षित वाढविण्याचे काम अगदी जुनाबाईसारख्या ‘सुपर मॉम’साठीही अधिक कठीण होत चालले आहे. ‘मटकासूर’ वाघाने तिच्या तीन बछड्यांना मारले, तर ‘ताला’ या वाघाने सुद्धा तिच्या बछड्यांना मारले. वाघांची संख्या वाढत असली तरी त्यांच्यासाठी उपलब्ध जागा तितकीच राहिली आहे, किंबहुना कमी होत आहे. त्यामुळे हद्दीसाठीच्या संघर्षात वाढ होत आहे आणि त्याचा पहिला फटका बसतो तो लहान बछड्यांना. त्यामुळे जुनाबाईसारख्या ‘सुपर मॉम्स’ना त्यांना आवश्यक तो अधिवास मिळालाच पाहिजे.

ती स्थानिकांचीही आई

अप्रत्यक्षपणे जुनाबाई आणि तिच्यासारख्या इतर वाघिणी अनेक स्थानिक लोकांचीही ‘आई’ बनली आहे. कारण तिच्या पिल्लांसह दर्शनामुळे मदनापूर–कोलारा बफर परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होते आणि अनेक कुटुंबांसाठी हा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत ठरतो. त्यामुळे जुनाबाई ताडोबातील सर्वोत्तम ‘सुपर मॉम्स’पैकी एक मानली जाते. तिचे राज्य अधिकाधिक काळ टिकावे हीच स्थानिकांचीही इच्छा आहे. शेवटी जुनाबाईचे अस्तित्व टिकले, तर गावकऱ्याच्या उपजीविकेचे चक्रही टिकते.