नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील एका पर्यटन मार्गावर पर्यटकांचा कॅमेरा पडला आणि काही वेळातच त्या वाटेवरून जुनाबाई ही वाघीण आपल्या बछड्यांसह आली. कॅमेऱ्याजवळ पोहोचल्यानंतर काही क्षण तिने तो न्याहाळला आणि नंतर त्याच मार्गाने पुढे निघून गेली.
लोकांसाठी कुतूहल, पण घटना गंभीर
हा व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर वेगाने व्हायरल झाला. अनेकांनी त्याकडे कुतूहलाने पाहिले, काहींनी त्याचा आनंद घेतला. मात्र, खरा प्रश्न कॅमेऱ्याकडे पाहणाऱ्या वाघिणीचा नाही, तर वाघाच्या अधिवासात कॅमेरा पोहोचलाच कसा याचा आहे. ही घटना केवळ करमणुकीचा विषय नाही. उलट वन्यजीव पर्यटनातील वाढत्या निष्काळजीपणाची आणि शिस्तभंगाची ती गंभीर नोंद आहे. जंगलात वाघ दिसणे हे नैसर्गिक आहे; मात्र वाघाला कॅमेरा, प्लास्टिकची बाटली, बॅग किंवा इतर मानवी वस्तू दिसणे हे निसर्गाच्या नियमांशी विसंगत आहे. त्यामुळे अशा प्रत्येक घटनेकडे वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे.
ताडोबाच नाही तर इतरत्रसुद्धा
ताडोबात अशा घटना आता अपवाद राहिलेल्या नाहीत. काही महिन्यांपूर्वी पर्यटन मार्गावर पडलेली कॅमेऱ्याची बॅग एका वाघाने तोंडात धरून नेल्याचा व्हिडीओ देशभर चर्चेत आला होता. त्यानंतरही अनेकदा वाघांच्या तोंडात प्लास्टिकच्या बाटल्या, जंगलात काम करणाऱ्या मजुरांचे गमबूट, झाडण्या किंवा इतर मानवनिर्मित वस्तू दिसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी वाघांचे बछडे तागाच्या गोणपाटांशी खेळताना दिसले. सोशल मीडियासाठी ही दृश्ये आकर्षक ठरत असली तरी ती जंगलातील वाढत्या मानवी हस्तक्षेपाची साक्ष देतात.
विशेष म्हणजे हा प्रकार केवळ ताडोबापुरता मर्यादित राहिलेला नाही. बोर व्याघ्रप्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य आणि इतर काही संरक्षित क्षेत्रांतही वन्यप्राण्यांच्या संपर्कात मानवी वस्तू आल्याच्या घटना अधूनमधून समोर येत आहेत. त्यामुळे वन्यजीव पर्यटनाचा विस्तार ज्या वेगाने होत आहे, त्याच वेगाने जबाबदारी आणि शिस्त वाढते आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
संवर्धनाच्या दृष्टीने घातक चित्र
वन विभागाकडून पर्यटक, वाहनचालक आणि मार्गदर्शकांसाठी स्पष्ट नियमावली लागू केली जाते. वाहनातून कोणतीही वस्तू खाली फेकण्यास किंवा टाकण्यास मनाई आहे. तरीही पर्यटन मार्गांवर अशा वस्तू वारंवार कशा आढळतात, याचे उत्तर मिळत नाही. त्यामुळे नियमांचे पालन आणि त्याची अंमलबजावणी यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, मानवी वस्तूंविषयी निर्माण होणारी उत्सुकता प्राण्यांच्या नैसर्गिक वर्तनात बदल घडवू शकते. प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तू गिळल्यास आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका असतो. त्याहून महत्त्वाचे म्हणजे वन्यजीव आणि मानवी उपस्थिती यांच्यातील नैसर्गिक अंतर कमी होऊ लागते. दीर्घकालीन दृष्टीने हे संवर्धनासाठी घातक ठरू शकते.
जंगलात मानवी हस्तक्षेप धोकादायक
वन्यजीव पर्यटनाचा उद्देश वाघाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाहणे हा आहे. मात्र, आता चित्र काहीसे उलटे दिसू लागले आहे. वाघ जंगलात मानवी वस्तूंची पाहणी करताना दिसत आहे. जुनाबाईच्या कॅमेऱ्याकडे पाहण्याचा व्हिडीओ त्यामुळे केवळ एक व्हायरल क्षण नाही; तो जंगलात वाढत्या मानवी हस्तक्षेपाचा आणि बेजबाबदार पर्यटन संस्कृतीचा आरसा आहे. वाघाच्या वाटेवर पडलेला कॅमेरा हा प्रत्यक्षात पर्यटन व्यवस्थापनासमोर उभा राहिलेला एक गंभीर प्रश्न आहे.
