नागपूर : पाणवठ्याच्या काठावर एक वाघ शांतपणे पाणी पीत उभा आहे… आणि त्याच्या अगदी शेजारी प्लास्टिकची बरणी, पिशव्या आणि थंडपेयाचे कॅन विखुरलेले दिसत आहेत. ही काही साधी दृश्ये नाहीत. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या या चित्रफितीने पुन्हा एकदा व्याघ्रप्रकल्प प्लास्टिकमुक्त ठेवण्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
अडीच वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या
अडीच वर्षांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या निमढेला बफर क्षेत्रात घडलेली एक घटना देशभर गाजली होती. त्या वेळी ‘नयनतारा’ नावाची वाघीण पाणवठ्यावर आली असताना पाण्यात तरंगत असलेली प्लास्टिकची बाटली तोंडाने बाहेर काढताना दिसली होती. हे दृश्य वन्यजीव अभ्यासक आणि छायाचित्रकार दीप काठीकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले होते. ही चित्रफीत समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाली आणि त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली होती. पर्यावरण आणि प्लास्टिक प्रदूषणाबाबत जागृतीचा मोठा संदेश या दृश्यातून गेला होता.
समाजमाध्यमांवर नेमके काय व्हायरल झाले
पाणवठ्यावर वाघ पाणी पीत असताना त्याच्या शेजारी प्लास्टिकचा कचरा दिसणारी कथित चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. केसलाघाट बफर क्षेत्रातील असल्याचा दावा केला जात असलेल्या या दृश्यामुळे व्याघ्रप्रकल्प प्लास्टिकमुक्त ठेवण्याच्या दाव्यांवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वीही बफर क्षेत्रात वाघ आणि प्लास्टिकशी संबंधित अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, प्रशासनाने मात्र ही चित्रफीत ताडोबातील नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या घटनेने व्याघ्रप्रकल्प प्लास्टिकमुक्त ठेवण्याच्या घोषणा कागदावरच राहिल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्रात पाणवठ्यावर वाघ आणि जवळच प्लास्टिकचा कचरा असलेली चित्रफीत समाजमाध्यमावर सामाईक झाल्याने व्यवस्थापनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘प्रयत्न’ आणि ‘परिणाम’ यांच्यातच दरी
केसलाघाटच्या या परिसरात काही दिवसांपूर्वी बांबू तोडणी करणारे मजूर थांबले होते. त्यांनीच हा कचरा टाकला असावा, असा कयास लावला जात आहे. मात्र, हा अंदाज खरा मानला तरी प्रश्न कायम आहे. मजूर निघून गेल्यानंतर या भागाची तपासणी का झाली नाही, आधीच्या घटनांचा अनुभव असूनही देखरेखीत ढिलाई का झाली, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. व्याघ्रप्रकल्प प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वारंवार सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र बफर क्षेत्रात अशा घटना सातत्याने घडत असल्याने ‘प्रयत्न’ आणि ‘परिणाम’ यातील दरी पुन्हा एकदा समोर आली आहे.
ताडोबाच्या वारंवार घडताहेत या घटना
डिसेंबर २०२० मध्ये ‘जुनाबाई’ वाघिणीचे बछडे प्लास्टिक पिशवीसोबत खेळताना दिसले होते. जानेवारी २०२१ मध्ये अलीझंझा बफर क्षेत्रात वाघाचा बछडा प्लास्टिकची बाटली उचलताना आढळला. मे २०२३ मध्ये ‘बबली’ वाघिणीचे बछडे पुन्हा प्लास्टिक बाटलीशी खेळताना दिसले. मुंबईतील वन्यजीवप्रेमी डॉ. राजूल महादार यांनी ही छायाचित्रे टिपली होती. याशिवाय बफर क्षेत्रात वाघाचे बछडे मजुरांच्या गमबूट व कपड्यांशी खेळताना दिसल्याच्या घटनाही समोर आल्या. विशेष म्हणजे या सर्व घटना ताडोबाच्या बफर क्षेत्रातील आहे.
ही चित्रफीत ताडोबातील नाही तर बाहेरची
समाजमाध्यमावर सामाईक झालेल्या या चित्रफितीत कुठेही ताडोबाचा किंवा केसलाघाटचा उल्लेख नाही. काहींनी तो मध्यप्रदेशचा असल्याचे देखील म्हटले आहे. ज्या वाघाचा उल्लेख होत आहे, तो ‘मामा’ वाघ पर्यटन क्षेत्राच्या बाहेर देखील जातो. त्यामुळे ही चित्रफीत केसलाघाटची असण्याचे काहीच कारण नाही., असे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पच्या बफर क्षेत्राचे उपसंचालक कुशाग्र पाठक म्हणाले.
