लोकसत्ता टीम

नागपूर : भारतातील कोणत्याही व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांना सफारीदरम्यान भ्रमणध्वनी वापरण्यापासून रोखले जात नाही. जागतिक नकाशावर नाव कोरलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाने पर्यटकांना सफारीदरम्यान भ्रमणध्वनी वापरण्यास मनाई केली आहे. एकीकडे हा नियम घालून द्यायचा आणि दुसरीकडे अतिविशिष्ट, मर्जीतल्या लोकांना मात्र भ्रमणध्वनी वापरण्याची मूभा द्यायची. त्यामुळे व्यवस्थापनाचे हे नियम प्रामाणिकपणे पैसे भरुन सफारी करणाऱ्या सर्वसामान्य पर्यटकांसाठीच आहेत का, असा प्रश्न पर्यटकांनी उपस्थित केला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात जगभरातील पर्यटक येतात. एवढेच नाही तर क्रिकेटपटू, चित्रपटसृष्टीतील कलावंत अशा सर्वांचीच ताडोबा ही पहिली पसंती आहे. अलीकडच्या वर्षात या व्याघ्रप्रकल्पाने पर्यटकांसाठी नवीनच नियम घालून दिला. पर्यटकांना सफारीदरम्यान कॅमेरा वापरण्याची मुभा आहे, पण भ्रमणध्वनी वापरण्यास मनाई आहे. पर्यटक मार्गदर्शकाजवळ त्यांना भ्रमणध्वनी जमा करावा लागतो. त्यामुळे इच्छा असूनही सर्वसामान्य पर्यटक व्याघ्रदर्शन झाले तरी त्याचे छायाचित्र काढू शकत नाही.

आणखी वाचा-वार्धक्यामुळे बँकेचे व्यवहार करू न शकणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा

भ्रमणध्वनी वापरू न देण्याची अनेक कारणे व्याघ्रप्रकल्प प्रशासनाने दिली असली तरीही ती पटण्यासारखी नाही. प्रशासनाची ही बाब एकदा मान्यही केली तरी काही अतिविशिष्ट लोकांना भ्रमणध्वनी वापरण्याची मूभा का, हा प्रश्न कायम आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रापेक्षाही बफर क्षेत्रातील वाघांनी पर्यटकांना आकर्षित केले आहे. या बफर क्षेत्रात सध्या अलीझंझा, निमढेला प्रवेशद्वार अधिक चर्चेत आहे. याठिकाणी ‘नयनतारा’, ‘छोटा मटका’, ‘भानूसखिंडी’ यासारख्या वाघांचे साम्राज्य आहे.

काही दिवसांपूर्वी या व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात अलीझंझा-निमझेला परिसरात द बांबू फॉरेस्ट सफारी लॉजचे वाहन पर्यटनासाठी आले होते. या लॉजचे संस्थापक आणि मालक सुनील मेहता आहेत. त्यांच्या वाहनांमध्ये जवळपास सर्वांकडेच मोठमोठे लेन्स असणारे कॅमेरे होते. त्यानंतरही त्यांनी भ्रमणध्वनीचा वापर केला. एकीकडे कॅमेरा नसणारे सर्वसामान्य पर्यटक वाघाचे छायाचित्र टिपू शकत नव्हते. तर दुसरीकडे या वाहनातील पर्यटक मात्र कॅमेऱ्यासह भ्रमणध्वनीचा वापर करुन वाघाचे छायाचित्र घेत होते.

आणखी वाचा-“मोदी विरोधकांनी एकत्र येऊन मतदान केले, पण आम्‍ही…”, नवनीत राणा यांची खंत; म्हणाल्या…

त्यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाने घालून दिलेले नियम केवळ सर्वसामान्य पर्यटकांसाठीच आहेत का, या व्याघ्रप्रकल्प प्रशासनाने त्यांना भ्रमणध्वनी वापरण्यासाठी विशेष मुभा दिली आहे का, त्यासाठी त्यांनी अतिरिक्त पैसे भरले आहेत का, असे प्रश्न सर्वसामान्य पर्यटकांनी उपस्थित केले आहेत. अतिविशिष्ट पर्यटकांच्या नोंदणीबाबत अशीच परिस्थिती आहे. अतिविशिष्ट् कोट्यातून सफारी नोंदणी करताना आधी सफारी दिली जाते. नंतर सफारी रद्द केल्याचे सांगण्यात येते. तेच रिसॉर्टमालकाकडून खात्रीलायक नोंदणी मिळते.