नागपूर : व्याघ्रदर्शन आणि छायाचित्रणासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटन नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. व्याघ्रप्रकल्पाच्या केसलाघाट, झरीपेठ भागात निर्धारित पर्यटन मार्ग सोडून जिप्सी थेट जंगलात उतरवून वाघाजवळ नेण्यात आली. पर्यटन वाहनांच्या हालचालींवर ‘बगिरा’सारखी देखरेख यंत्रणा असतानाही हा प्रकार घडल्याने या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

निर्धारित मार्ग सोडून वाहन जंगलात

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पर्यटन मार्गावर शनिवारी सायंकाळच्या सफारीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. काही पर्यटक वाहनांनी निर्धारित मार्ग साेडून रस्त्यालगतच्या जंगल क्षेत्रात प्रवेश केला. यात विशेष कोट्यातून(व्हीआयपी) दिलेल्या एका वाहनाचा देखील समावेश असल्याचे कळते. वाघाच्या अगदी जवळ वाहन नेऊन त्याचा पाठलाग करण्यात आल्याचे छायाचित्रातून स्पष्ट दिसून येत आहे. समाजमाध्यमावर टाकण्यात आलेली ही छायाचित्रे नंतर लगेच त्यावरुन काढून टाकण्यात आली. हे निर्धारित पर्यटन नियमांचे उल्लंघन असून, व्याघ्र अधिवासाच्या दृष्टीनेही गंभीर बाब आहे.

‘बगिरा’ ॲपच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह

विशेष म्हणजे, ताडोबातील पर्यटन वाहनांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी ‘बगिरा’ देखरेख ॲपचा वापर केला जातो. वाहन निर्धारित मार्गावर आहे की नाही, याची नोंद या प्रणालीद्वारे होणे अपेक्षित आहे. मग केसलाघाट, झरीपेठमध्ये वाहनाने निर्धारित मार्ग सोडून जंगलात प्रवेश केला असेल, तर ही बाब ‘बगिरा’च्या निदर्शनास आली नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. केवळ संबंधीत पर्यटक वाहनचालक आणि मार्गदर्शकावर कारवाई करुन विषय संपणार नाही. तर संबंधित वाहनाची ओळख पटवून ‘बगिरा’ ॲपमधील जीपीएस नोंदी तपासणे, त्या वेळची वाहनाची हालचाल पडताळणे आणि प्रत्यक्ष देखरेख करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.

गेल्या दीड वर्षांपासून ही क्षेत्र उजेडात

केसलाघाट, झरीपेठ, सोमनाथ या क्षेत्राला पर्यटकांचा फारसा प्रतिसाद नव्हता. मात्र, याठिकाणी व्याघ्रदर्शन वाढल्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून ही क्षेत्रे उजेडात आली. मामा, ज्युनिअर मोगली हे वाघ तसेच के मार्क आणि तिच्या बछड्यांचा हा अधिवास आहे. अवघ्या दहा-दहा किलोमीटर अंतरावर ही तिन्ही पर्यटन क्षेत्र आहेत. या क्षेत्रात दिवसभरात १८ पर्यटक वाहने जातात. आतापर्यंत पावसाळ्यात पर्यटनासाठी बंद ठेवले जाणारे हे क्षेत्र यावर्षी पर्यटनासाठी खुले करण्यात आले.

अधिकारी म्हणतात कारवाई करू

चौकशी सुरू करण्यात आली असून दोषी आढळल्यास एक वर्षासाठी निलंबन केले जाईल, असे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल यांनी सांगितले. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरू केली जाईल आणि आवश्यक ती शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे उपसंचालक आनंद रेड्डी यांनी सांगितले.