चंद्रपूर : वाघांचे दर्शन, समृद्ध जैवविविधता आणि निसर्गरम्य जंगलाचा अनुभव घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आपली छाप अधिक ठळक केली आहे. मागील वर्षात तब्बल ३ लाख ८९ हजार ७०० पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली. विशेष म्हणजे, यामध्ये ९१ देशांतील २० हजार ९३९ विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. त्यामुळे ताडोबाची लोकप्रियता केवळ देशांतर्गत नव्हे, तर जागतिक पातळीवरही वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ताडोबा म्हणजे केवळ वाघांचे जंगल नाही, तर विविध वन्यजीव, पक्षी, वनस्पती आणि वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक अधिवासाने समृद्ध असलेला जैवविविधतेचा अमूल्य ठेवा आहे. नैसर्गिक अधिवासात वाघांचे दर्शन, जंगल सफारी आणि वन्यजीवनाचा प्रत्यक्ष अनुभव यामुळे विदेशी पर्यटकांसाठी ताडोबा भारतातील महत्त्वाचे वन्यजीव पर्यटन केंद्र ठरत आहे.
दरम्यान, वाढत्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना त्यांच्या परिचित भाषेत माहिती देता यावी, यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने मार्गदर्शकांच्या भाषिक कौशल्यविकासावरही भर दिला आहे. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. प्रभू काय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी आणि जर्मन भाषेतील विशेष संभाषणात्मक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले.
कोअर झोनमधील महिला निसर्ग मार्गदर्शकांसाठी २ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान मोहली येथे इंग्रजी संभाषणात्मक प्रशिक्षण घेण्यात आले. यात १४ महिला मार्गदर्शक सहभागी झाल्या. त्यानंतर १७ ते २७ ऑगस्टदरम्यान मोहली आणि मदनापूर येथे पुरुष व महिला मार्गदर्शकांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात ४२ मार्गदर्शक सहभागी झाले.
पर्यटकांची वाढती संख्या ताडोबाच्या पर्यटन क्षमतेचे द्योतक असली, तरी त्यासोबत वन्यजीव संवर्धन, पर्यावरणीय समतोल आणि शाश्वत पर्यटनाचा विकास हे आव्हानही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे जागतिक पर्यटकांचे आकर्षण वाढत असताना ताडोबाची नैसर्गिक ओळख आणि जंगलाचा अधिवास अबाधित राखण्याची जबाबदारीही अधिक वाढली आहे.
